नागरिक कंटाळले, प्रशासनाला घाम फुटेना, आमदार सुरेश धस साहेब, प्रशासनाला जाब विचारणार का ?
आरंभ मराठी |धाराशिव
कोणीही तक्रारी करू नये,कोणीही समस्या मांडू नये आणि अधिकाऱ्यांनी विकास कामाशिवाय दिवस घालवत राहावं अशी स्थिती धाराशिव शहराची झाली आहे. भुयार गटारच्या नावाखाली खोदण्यात आलेल्या खड्ड्यांनी नागरिक मेटाकुटीला आले आहेत.या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी,यासाठी लोकप्रतिनिधींकडूनही जोर दिला जात नाही. त्यामुळे बिचारी त्रस्त जनता मुकाटपणे खड्ड्यांचा मार सहन करत आहे. पण आता हा त्रास खुद्द महापुरुषांनाही सहन करायचा आहे. छ्त्रपती संभाजी महाराज यांची उद्या जयंती असून, शहरातून भव्य मिरवणूका काढण्यात येणार आहेत. विशेषतः जिजाऊ चौक, बार्शी नाका भागातून बहुतांश मिरवणूका निघतात. या मार्गावर प्रचंड खड्डे असून, खड्ड्यातून मार्ग शोधताना अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
धाराशिव शहरात समस्यांची रीघ आहे. सत्ता कुणाचीही असली तरी समस्या कायम आहेत. रस्ते, नाल्या, कचऱ्याची समस्या, बंद पथदिव्यांमुळे होणारे हाल अजून संपलेले नाहीत. त्यात भर म्हणून भुयार गटार योजना राबविण्यात आली आणि चांगल्या स्थितीत असलेले रस्तेही खोदून टाकण्यात आले.शहरात भुयार गटार योजनेच्या कामामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. काही भागात 2 वर्षांपूर्वी रस्ते खोदण्यात आले आहेत.अजूनही दुरुस्ती नसल्याने नागरिकांना मार्ग शोधताना प्रचंड त्रासाला तोंड द्यावे लागते. रस्त्यांची कामे सुरू कधी होणार, खोदलेल्या मार्गाच्या दुरुस्तीची कामे का सुरू होत नाहीत, याबाबत कोणीच उत्तर देत नाही.
मिरवणूक मार्गावर खड्डेच खड्डे
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी सायंकाळी धाराशिव शहरात भव्य मिरवणूका काढण्यात येणार आहेत. विशेषतः जिजाऊ चौक, बार्शी नाका भागातून बहुतांश मिरवणूका निघतात. जिजाऊ चौक ते उंबरे कोठा मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गावरून महाराजांच्या मूर्तींच्या मिरवणूका निघणार आहेत. खड्ड्यांमुळे अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासंदर्भात शंभू राजे प्रेमींनी नगर पालिकेकडे रस्ते दुरुस्तीची मागणी केली. मात्र पालिकेकडून टाळाटाळ केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुरेश धस साहेब, आता तुम्हीच लक्ष घाला
धाराशिव नगर पालिकेत भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. वेगवेगळ्या चौकश्या सुरू आहेत.दुसरीकडे शहरातील विकास कामे ठप्प आहेत. अगदी रूटीन दैनंदिन कामेही होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.उद्याच्या छ्त्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार सुरेश धस स्वतः धाराशिव शहरातील जिजाऊ चौक, बार्शी नाका येथे येत आहेत. त्यांनी या रस्त्यासोबतच शहरातील दुरुस्तीविना रखडलेल्या रस्त्यांचा नगरपालिकेकडून आढावा घ्यावा. शहरातील रस्त्यांची दुरुस्ती का होत नाही याबाबत जाब विचारावा अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.