धाराशिव विशेष न्यायालयाचा निकाल
आरंभ मराठी / धाराशिव
पळवून नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला धाराशिवच्या विशेष न्यायालयाने 10 वर्षे सक्त मजुरी आणि 21 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी धाराशिव शहरातील सांजा रोड भागातील रहिवासी आहे.
प्रकरणाची हकीकत की, घटनेच्या दोन वर्षापूर्वीपासून आरोपी व पीडितेचे कुटुंब एकत्र ऊसतोड कामगार म्हणून विविध ठिकाणी काम करीत होते. दरम्यानच्या काळात आरोपीने पीडितेस तिच्या अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेऊन पिडीतेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
ऊस तोडीचे काम संपल्यानंतर आरोपीने पीडितेस व तिच्या आईस एका बांधकाम मिस्त्रीकडे मजूर म्हणून काम मिळवून दिले. सदर घटनेच्या दिवशी ७.०५.२०१९ रोजी पिडीत ही एकटी बांधकामाच्या कामावर जात असताना आरोपी हकीम काझी याने आज बांधकामावर काम नाही, दुसरीकडे काम आहे, असे म्हणून त्याच्या अपसिंगा येथील शेतात नेले व त्यानंतर बसने हुमनाबाद येथे घेऊन गेला. तेथे ओळखीचे लोक आहेत असे म्हणून तिला बुरखा घालण्यास दिला व तेथून जहीराबाद येथे घेऊन गेला. त्या ठिकाणी आरोपीने पीडितेस आरोपीच्या लहान मुलासोबत रूमवर २६.५.२०१९ पर्यंत ठेवले त्या दरम्यानच्या काळात आरोपीने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले.
पीडिता कामावरून परत आली नाही म्हणून नातेवाईकांनी तिचा शोध घेतला, परंतु ती न मिळून आल्याने बांधकाम मिस्त्रीकडून माहिती मिळाल्याने पिडीतेच्या आईने आरोपी हकीम मेहबूब काजी (रा. रामनगर, सांजा रोड,धाराशिव) याच्या विरुद्ध तिच्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेले म्हणून तक्रार दिली होती. सदर तक्रारीवरून आरोपी विरुद्ध आनंद नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.गुन्ह्याचा तपास पीएसआय डी. व्ही. सिद्धे व पीएसआय एस. जी. भुजबळ यांनी पूर्ण करून आरोपी विरुद्ध मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
प्रकरणाची सुनावणी तत्कालीन विशेष न्यायाधीश एस. डी. जगताप व विशेष न्यायाधीश टी.जी. मिटकरी यांचे न्यायालयात पूर्ण झाली. प्रकरणात आरोपी विरुद्ध दोषसिद्धीसाठी सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणातील पीडितेची नैसर्गिक साक्ष, मुख्याध्यापकाची साक्ष तसेच वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. आरोपी हा विवाहीत असून त्यास तीन मुले असतानाही अल्पवयीन पिडीतेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले होते.
सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेले साक्षीदार व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून विशेष न्यायाधीश टी. जी. मिटकरी यांनी आरोपी हकीम मेहबूब काझी यास भा.द.वि. चे कलम ३६३ अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी व रू ३,००० रू द्रव्यदंड, कलम ३६६ अन्वये ०५ वर्षे सक्तमजुरी व रू ३,००० रू द्रव्यदंड, कलम ३७६ अन्वये १० वर्षे सक्तमजुरी व रू ५,००० रू द्रव्यदंड, तसेच बा.लें.अ. प्रतिबंधक कायदा कलम ४ व ६ अन्वये प्रत्येकी १० वर्षे सक्तमजुरी व रू ५,००० रू द्रव्यदंड अशी शिक्षा ३१.०१.२०२५ रोजी सुनावली. सर्व शिक्षा आरोपीने एकत्रीत भोगावयाची आहे.