दोन महिलांनी योजनेचे 12 हजार रुपये केले परत
निकषांची पडताळणी होण्याच्या भीतीने योजनेतून बाहेर पडणार्या महिलांची संख्या वाढणार
सज्जन यादव / आरंभ मराठी
धाराशिव
लाडकी बहीण योजनेमध्ये अडीच लाखांहून अधिक उत्पन्न आणि चारचाकी वाहन नसलेल्या बहिणींना योजनेच्या लाभास पात्र ठरविण्यात आले. तथापि, धाराशिव जिल्ह्यात पडताळणी आधी चार लाख लाभार्थी महिलांपैकी फक्त दहा लाडक्या बहिणींनी योजनेतून बाहेर पडण्यासाठी स्वतःहून पुढे येऊन अर्ज दिले आहेत. तर यातील दोन महिलांनी लाभ नाकारत मिळालेली 12 हजार रुपये रक्कम महिला व बाल कल्याण विभागाकडे परत केली आहे.
राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. आता अनुदान वाढीचा निर्णय घेतला जाणार असल्याने लाभ घेणार्या अनेक लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आली आहे. कारवाई करण्याच्या आधी सरकारने निकषांमध्ये न बसणार्या लाडक्या बहिणींना स्वतःहून लाभातून माघार घेण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी धाराशिव जिल्ह्यातून दहा बहिणी पुढे आल्या.
माझ्याकडून नजरचुकीने हा अर्ज केला गेला, मला आता या योजनेचा लाभ नको आहे, माझे उत्पन्न वाढले आहे, मला नोकरी लागली आहे अशी कारणे देऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारण्यात आला आहे.
अपात्र असूनही लाभ घेणार्या बहिणींना शिक्षा होणार या चर्चेमुळे त्यांच्यात घबराट निर्माण झाली होती. धाराशिव जिल्ह्यातील लाभार्थ्यांपैकी निकषात न बसलेल्या महिलांना लाभ सोडण्याचे आवाहन करण्याच्या सूचना केल्या होत्या.
त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात धाराशिव जिल्ह्यातील एका महिलेने विभागाशी संपर्क साधून मला चुकून या योजनेचा लाभ मिळत आहे असे सांगून लाभ नाकारला होता. त्यानंतर एका मुलीने नोकरी लागल्याचे कारण देत हा लाभ नाकारला होता.
जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील सहा लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ नाकारला आहे. आतापर्यंत एकूण दहा लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ नाकारला आहे. एका महिलेचे चुकून या योजनेत नाव समाविष्ट झाले होते.
तसेच एका महिलेला नोकरी लागली म्हणून तिनेही योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. दुसर्या एका महिलेने माझे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त झाल्याचे सांगत लाभ नाकारला आहे.
अशा प्रकारे जिल्ह्यातील आतापर्यंत 10 महिला योजनेतून बाहेर पडल्या आहेत. जानेवारी महिन्यात योजनेतून बाहेर पडणार्या महिलांची संख्या वाढली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये सुमारे चार लाख लाडक्या बहिणी आहेत. ही आकडेवारी पाहता लाभ नाकारणार्या महिलांची संख्या खूपच थोडी असल्याचे दिसते.
दोन महिलांनी 12 हजार रुपये केले परत
योजनेतून बाहेर पडणार्या 10 महिलांपैकी दोन महिलांनी योजनेतून बाहेर पडताना आतापर्यंत मिळालेले पैसेदेखील विभागाला परत करण्याचा प्रामाणिकपणा दाखवला. यातील एका महिलेने 4500 रुपये तर दुसर्या महिलेने 7500 रुपये स्वतःहून परत दिले. विभागाकडून हे पैसे शासनाला परत पाठवले आहेत.
लाभ सोडणार्या महिलांची संख्या वाढणार
आतापर्यंत केवळ 10 महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ सोडण्यासाठी अर्ज केलेला आहे. मात्र, फेरतपासणी होणार असल्याने लाभ सोडणार्या महिलांची संख्या भविष्यात वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी होऊ शकते. निकषात न बसणार्या ज्या महिला लाभ घेत आहेत त्यांची तपासणी झाल्यास त्यांच्यावर कारवाई होण्याची भीती महिलांना असल्यामुळे पुढच्या काळात लाभ नाकारणार्या महिलांची संख्या वाढू शकते.
निकषात न बसणार्या महिलांनी स्वतःहून अर्ज करावा
लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला निकषात बसत नाहीत परंतु त्या लाभ घेतात त्यांनी स्वतःहून पुढे येऊन योजनेतून बाहेर पडण्यासाठी अर्ज करावा. दोन योजनांचा लाभ घेणार्या महिलांनी देखील कोणती तरी एकच योजना सुरू ठेवावी.
सध्या जिल्ह्यातील दहा महिलांनी स्वतः होवून योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तर दोन महिलांनी खात्यावर आलेले पैसे देखील परत दिले आहेत. शासनाकडून निकषांची पडताळणी करण्याची शक्यता असल्यामुळे पुढील काळात अनेक महिला या योजनेतून माघार घेऊ शकतात.
किशोर गोरे
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी (प्रभारी), धाराशिव