आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव आणि कळंब तालुक्यात शनिवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. अवघ्या चार तासात तब्बल दीडशे मिलिमीटर पाऊस पडल्यामुळे शेतशिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी आणि बळीराजाला धीर देण्यासाठी आमदार राणा पाटील आणि आमदार कैलास पाटील दोघांनीही रविवारी सकाळीच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.
आमदार राणा पाटील यांनी धाराशिव तालुक्यातील काही गावात तर कैलास पाटील यांनी कळंब तालुक्यातील काही गावात जाऊन पाहणी केली. लोकप्रतिनिधी बांधावर आल्यामुळे शेतकऱ्यांचे दुःख हलके झाले असले तरी या संकटाने उन्मळून पडलेल्या बळीराजाला आर्थिक मदतीची गरज आहे.
यासाठीच शासकीय पातळीवर पाठपुरावा करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. आमदार राणा पाटील यांनी आज सकाळीच तहसीलदार, मंडल अधिकारी आणि शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तेर येथील तेरणा नदीची पाहणी केली. तेरणा नदीने धोक्याची पातळी गाठली असून, तेर येथील काही घरांमध्येही पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.
यावेळी आमदार राणा पाटील यांनी दुधगाव, जवळा, रामवाडी, आरनी, भंडारवाडी या भागात जाऊन पाहणी केली. सर्व ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
काही ठिकाणी पिकांसह शेतजमीनीची माती देखील खरवडून गेली आहे. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आमदार राणा पाटील यांना लवकर प्रयत्न करून शासकीय मदत मिळवून द्यावी अशी विनंती केली. नुकसान झालेल्या भागात नुकसानीचे पंचनामे करून लवकर अहवाल सादर करावा अशा सूचना आमदार राणा पाटील यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
दुसरीकडे आमदार कैलास पाटील यांनीही कळंब तालुक्यातील शेलगाव (ज.), सातेफळ, वाघोली या भागात जाऊन पाहणी केली. कळंब तालुक्यात देखील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऑगष्ट महिन्यात देखील या धाराशिव जिल्ह्यातील बऱ्याच भागात अतिवृष्टीमुळे नुकसान होऊनही सरकारने धाराशिव जिल्ह्याला मदत जाहीर न केल्याबद्दल आमदार कैलास पाटील यांनी संताप व्यक्त केला.
धाराशिव जिल्ह्यात मागील कालावधीत आणि काल झालेल्या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतमाल पूर्णपणे उध्वस्त झाला असून, जनावरांसाठी चारा उपलब्ध नाही. शेतकऱ्यांची घरे व संसार उद्ध्वस्त झाली आहेत. शेतकरी वर्ग अक्षरशः मेटाकुटीला आला आहे.
अशा गंभीर परिस्थितीतही मायबाप सरकारकडून कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही, हे अत्यंत दुःखद आणि संतापजनक आहे. आणखी किती हानी झाल्यावर सरकारच्या यंत्रणेचे डोळे उघडणार? असा उद्विग्न सवाल आमदार कैलास पाटील यांनी यावेळी केला. धाराशिव जिल्ह्यातील काही भागात शनिवारी रात्री दीडशे मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
पीक विम्याचे निकष बदलल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्यातून मदत मिळणे देखील अशक्य आहे. निकष बदलले नसते तर आज शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा मिळाला असता. राज्य सरकारने देखील अनुदानाच्या रकमेत कपात केल्यामुळे शेतकऱ्यांची झालेली हानी भरून निघणे कठीण आहे. सध्या दोन्ही आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बळीराजाला दिलासा देत असले तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाल्याशिवाय हे दुःख हलके होणार नाही अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.