अरुंद पुलामुळे अपघातांचे प्रमाण वाढले
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव उजनी रस्त्यावर गुरुवारी (दि.२) रात्री दहा वाजता इर्टीगा कार आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला.या अपघातात इर्टीगा कारचा चालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हा अपघात धाराशिव ते उजनी या रस्त्यावर रुईभर चौकापासून पाचशे मीटरवर एका पुलाजवळ झाला. अपघात इतका भीषण होता की, अपघातात इर्टीगा कार चक्काचूर झाली तर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकचे एक्सल जागेवरच तुटून पडले. ट्रकला समोरून उजव्या बाजूने इर्टीगा कारने जोरात धडक दिली.
अपघात झालेले ठिकाण हे अपघातप्रवण क्षेत्र बनले असून गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर अपघातांची संख्या वाढली आहे. धाराशिव ते उजनी या रस्त्याचे बऱ्यापैकी काम झाले असून, काही काम अजूनही सुरू आहे. या रस्त्यावरील पुलांचे काम मात्र अजूनही झालेले नाही. त्यामुळे बऱ्यापैकी रुंद असणारा हा रस्ता पुलाजवळ अरुंद होत जातो. त्यातच रस्त्याच्या कामासाठी आणलेला मुरूम रस्त्यावरच टाकला असल्यामुळे दुचाकी गाड्या घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.
मागील चार दिवसात या रस्त्यावर सहा अपघात झाल्याचे काही नागरिकांनी सांगितले. कंत्राटदार कंपनीने रस्त्यावर एकही सूचना फलक लावलेला नाही. हा रस्ता नवीन केलेला असल्यामुळे या रस्त्यावर चारचाकी गाड्या 80 ते 100 च्या स्पीडने जातात. त्यातच पुलाजवळ गाडी आली की रस्ता एकदम अरुंद होत असल्यामुळे चालकांना गाडी कंट्रोल करणे शक्य होत नाही. संबंधित कंत्राटदाराने या रस्त्यावर ठिकठिकाणी सूचना फलक लावून रस्त्यावरील मुरूम तात्काळ काढून टाकावा अशी मागणी या रस्त्यावरून दररोज प्रवास करणारे नागरिक करत आहेत.
31 डिसेंबरच्या दिवशी या रस्त्यावर काही तासांच्या अंतराने चार मोठे अपघात झाले होते. अरुंद असणाऱ्या पुलाच्या ठिकाणी रस्त्यावरच मुरूम टाकल्यामुळे दुचाकी गाड्या घसरून देखील अपघात होत आहेत. या रस्त्यावर सूचना फलक लावून पूल अरुंद असल्याचे आणि रस्त्याचे काम सुरू असल्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी या रस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासी करत आहेत.