जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात महसूल,कृषी विभाग आणि विमा कंपनी करणार पाहणी
सचिन दराडे / तेरखेडा
प्रधान मंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण आहे प्रत्येक वर्षी जिल्ह्यातील लाखो शेतकरी या योजनेमध्ये सहभागी होतात आणि प्रतिकूल परिस्थितीत निसर्गाची निर्माण झाल्यास पीक विमा कंपनीकडून या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य केले जाते.जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून अग्रीम दिली जावी यासाठी महसूल, कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या संयुक्त पथकामार्फत पाहणी करून अहवाल सादर केला जाणार आहे. तीन दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिल्या असून, त्यानुषंगाने पाहणी सुरू झाली आहे.
मागील महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. जिल्ह्यातील बऱ्याच मंडळामध्ये सरासरीपेक्षा अत्यंत अल्प प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व आशा आता फक्त पिक विमा कंपनीकडे लागली आहे. झालेल्या जिल्हा सनियंत्रण समितीच्या बैठकीतील सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील तालुका कृषी प्रमुख यांना प्राप्त झालेल्या सूचनानुसार आपल्या तालुक्यामध्ये एकूण प्रत्येक मंडळात पावसाचा खंड पडल्यामुळे एकूण उंबरठा उत्पन्नातील घट आणि तफावत याचा अभ्यास करण्यासाठी प्रत्येक मंडळामध्ये समिती गठीत करण्यात आल्या आहेत.या समित्यांनी 3 दिवसात आपल्या मंडळातील पाच टक्के क्षेत्राचा रँडम सर्वे करून तो अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश देण्यात आलेल आहेत.
या समितीमध्ये तालुका कृषी अधीक्षक मंडळ कृषी अधीक्षक पिक विमा कंपनी प्रतिनिधी संबंधित भागातील कृषी सहाय्यक यांचा समावेश करण्यात आला आहे. संबंधित समितीला तीन दिवसात सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यामुळे पाहणी सर्व्हे सुरू झाला असून, लवकरच विमा कंपनी कडून तसेच सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीसाठी निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी अपेक्षा आहे.
कशी मिळेल मदत ?
जिल्ह्यात महिन्यापासून पावसाने ओढ दिली असून, त्यामुळे खरिपातील पिके वाया जात आहेत. माळरानावर पिकांनी माना टाकल्या आहेत तर काही ठिकाणी शेतकरी स्प्रिंक्लर लावून पिकांना जीवदान देण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर किमान 50 टक्के पीक वाया गेल्याचे निष्पन्न झाल्यास विमा भरलेल्या शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम म्हणून पीक विमा कंपनीकडून 25 टक्के रक्कम तातडीने दिली जाऊ शकते. त्यासाठी पाहणी अहवाल महत्वाचा आहे.