गजानन तोडकर / कळंब
पोलिस ठाण्यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील पेट्रोल पंपावर मध्यरात्री कोयत्याचा धाक दाखवून दरोेडेखोरानी सुमारे सव्वातीन लाखांची रोकड लुटली. ही घटना रविवारी मध्यरात्री कळंब शहरापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील येरमाळा रोडला घडली असून यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास गतिमान केला आहे.
कळंब शहरालगत असलेल्या आणि शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील राजश्री पेट्रोल पंपावर रविवारी रात्री सशस्त्र दरोडा पडला. शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या येरमाळा रोडवरील राजश्री पेट्रोल पंपावर चार दरोडेखोरांनी कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकला. यामध्ये दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावरील ३ लाख २८ हजार रुपयांची रोकड लंपास केली. दरम्यान चोरट्यांनी अवघ्या चार मिनिटात पेट्रोल पंपावर दरोडा टाकून रोकड पळविल्याची घटना सीसीटिव्ही फुटेजवरून उघड होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चार दरोडेखोर हातात कोयते घेऊन रविवारी रात्री पेट्रोल पंपावर आले होते. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून पंपावरील कामगारांना ऑफिसच्या चाव्याची मागणी केली. काही कामगारांनी चाव्या देण्यास नकार दिल्यामुळे कामगारांवर कोयते उगारून त्यांना भीती दाखवण्यात आली. घाबरलेल्या अवस्थेत कामगारांनी चाव्या दिल्या. ऑफीसमध्ये असलेल्या तीन कॅश काऊंटरमधून चोरट्यांनी ३ लाख २८ हजार रुपये घेवून धूम ठोकली. पोलिस निरीक्षक सुरेश साबळे यांनी घटनास्थळाला भेट घेऊन पाहणी केली तसेच तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे हा पेट्रोल पंप पोलीस स्टेशनपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तैनात केली आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षक गौहर हसन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार, पोलिस निरीक्षक सुरेश साबळे आदी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि गुन्ह्याची माहिती घेतली. पुढील तपास पोलीस करत आहेत.