परंडा येथील महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाम विश्वास
आरंभ मराठी / परंडा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आहे. लाडक्या बहिणीच्या जीवनात चांगले दिवस येतील. ज्या लाडक्या बहिणी या योजनेला पात्र आहेत. त्या कोणत्याही परिस्थितीत वंचित राहणार नाहीत. या योजनेचा लाभ मिळेपर्यंत योजना सुरू राहणार आहे. कोणीही काळजी करायची गरज नाही. लाडक्या बहिणींची साथ देणारा हा एकनाथ आहे. यापुढेही तुम्हाला दीड हजार रुपये महिना मिळणार म्हणजे मिळणार. कोणीही योजना बंद करू शकणार नाही. योजना बंद होणार नाही,असा ठाम विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
परंडा येथील कोटला मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम सुरू आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना माझी लाडकी बहिण योजनेचे फायदे सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,ही योजना चुनावी जुमला नाही. ही योजना फक्त निवडणुकांपर्यंत नाही.कोर्टाने सुद्धा काही लोकांना या संदर्भात फटकारले आहे. त्यामुळे या योजनेमध्ये कोणी येऊ नये.
पैशांच्या राशीत लोळणाऱ्याना दीड हजाराची किंमत कधीच कळणार नाही. ही किंमत फक्त माझ्या लाडक्या भगिनींना कळली आहे. कारण एका शेतकरी कुटुंबा मधून मी आलो आहे. त्यामुळे या दीड हजाराचे महत्त्व अधिक आहे.
राज्यातील बहिणींनी मला लाडका भाऊ केले आहे,लाखो बहिणीचे प्रेम मिळत आहे.
एका सर्वसामान्य कुटूंबातून मी आलो आहे.सगळ्या लाडक्या बहिणींना मी साथ देणार आहे. लाडक्या बहिणीच्या जीवनात बदल घडून आणण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांनी मला लोकसेवेची संधी दिली – डॉ.तानाजी सावंत यांच्याकडून कौतुक
यावेळी प्रस्ताविक करताना पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत म्हणाले, आरोग्य खात्यामार्फत लोकसेवेची संधी मुख्यमंत्र्यांनी मला उपलब्ध करून दिली.त्यामुळे माता सुरक्षित घर सुरक्षित हे अभियान आपण राबवू शकलो.
आरोग्य विभागामध्ये 39 निर्णय आपण 24 महिन्यांमध्ये घेतले आहेत. जे सर्वच्या सर्व लोकाभिमुख आहेत. भूतो ना भविष्यती अशा पद्धतीने जन आरोग्याचे कार्य स्वतः सुरू आहे.
राज्यामध्ये माता मृत्युदर बालमृत्युदर कमी करण्यात आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात यश आले भारतामध्ये महाराष्ट्राचा यामध्ये दुसरा क्रमांक आहे. पंतप्रधानांनी केंद्र स्तरावरून पाच लाखाची योजना केली आहे. महाराष्ट्राने पाच लाखाची योजना केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कोणत्याही जनतेला आरोग्यासाठी आता चिंता करायची गरज नाही. महात्मा फुले जन आरोग्य योजनेची आर्थिक कक्षा वाढविण्यात आली. दीड लाखावरून पाच लाखाची ही योजना या शासनाने केली आहे. या योजनेवर आता कोणतेही कॅपिंग ठेवण्यात आले नाही. सर्वांसाठी हा लाभ खुला आहे.
आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. साडेअकरा हजार युवकांना नोकरी देण्यात आली.
राज्यातील अडीच हजार दवाखान्यांमध्ये मोफत उपचार करण्यात आले आहे.त्यामुळे आता ओपीडीमध्ये वाढ झाली आहे. आशा वर्कर यांनी कोरोनामध्ये सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्याचे काम केले आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना मानधन वाढवण्याचा आम्ही निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांची दुःख ओळखून घेतलेला हा निर्णय आहे.मुख्यमंत्र्यांनीही आरोग्य खात्याचे कौतुक केले. तसेच आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या कर्याचेही कौतुक केले.