आरंभ मराठी / धाराशिव
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यापूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेल्या शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या कार्यकर्त्यांची पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी भेट घेऊन उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले.त्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या हस्ते ज्यूस घेऊन सहाव्या दिवशी उपोषण सोडले. विशेष म्हणजे रविवारी माजी खासदार संभाजी छ्त्रपती महाराज यांनी या तरुणांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे आंदोलनाला बळ वाढले होते.
सोमवारी सकाळपासूनच शिवप्रेमींनी उपोषणस्थळी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे तासभर केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यादरम्यान काही आंदोलकांनी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्यासोबत चर्चा केली होती. आंदोलकांशी सकारात्मक चर्चा केल्यानंतर पोलीस अधीक्षक जाधव यांनी स्वतः रास्ता केलेल्या ठिकाणी येऊन मराठा बांधवांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी उपोषण करणाऱ्या तरुणांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देत पाचही तरुणांनी संजय जाधव यांच्या हस्ते ज्यूस घेऊन उपोषण मागे घेतले.
शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने 4 सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धर्मराज सूर्यवंशी, अमोल सिरसट, दत्तात्रेय जावळे, योगेश आतकरे, सतीश थोरात यांनी आत्मक्लेष आमरण उपोषण सुरू केले होते. त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी आंदोलकांची भेट घेऊन छत्रपती संभाजी महाराज यांनी प्रकृतीची विचारपूस केली होती. तसेच काळजी घेण्याचे आवाहन केले होते.
या आंदोलकांना समर्थन देण्यासाठी सोमवारी सकाळपासूनच शिवप्रेमी बांधवांनी उपोषणस्थळी गर्दी केली होती.सकाळपासूनच तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून उपोषणस्थळी 60 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले होते.अखेर पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे शिवप्रेमींनी आंदोलन स्थगित केले आहे.