नाका बॉईज ग्रुप आणि राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन, 4 दिवसात 250 युवकांचे रक्तदान
आरंभ मराठी | धाराशिव
युवकांचे प्रेरणास्थान छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी प्रथमच पाच दिवस रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिरात सोमवारपर्यंत सुमारे अडीचशे युवकांनी रक्तदान केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य 16 फूट उंचीच्या मूर्तीची धाराशिव शहरात मिरवणूक काढण्यात येणार असून, या मिरवणुकीचे उद्घाटन व संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन आमदार सुरेश धस यांच्या हस्ते होणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी सायंकाळी धाराशिव शहरात विविध प्रतिष्ठान,संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिजाऊ चौक,बार्शी नाका येथील नाका बॉईज ग्रुपच्या वतीने महाराजांच्या भव्य 16 फूट मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
नाका बॉईज ग्रुपच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 11 वर्षापासून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. नाका बॉईज ग्रुपच्या वतीने या मिरवणुकीची तयारी चार दिवसांपासून सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता मिरवणुकीचे उद्घाटन विधान परिषद सदस्य आमदार सुरेश धस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची उपस्थिती राहणार आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड,भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सतीश दंडनाईक, धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, पत्रकार संतोष जाधव, धनाजी अनंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या शंभू राजे जन्मोत्सव सोहळ्यास शिवप्रेमी, शंभू राजे प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजमुद्रा प्रतिष्ठान आणि नाका बॉईज ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.
रक्तदानाचे महान कार्य
गेल्या अकरा वर्षापासून छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करणाऱ्या नका बॉईज ग्रुपच्या वतीने यावर्षी प्रथमच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून जिजाऊ चौक बार्शी नाका परिसरात रक्तदान शिबिर सुरू आहे. आतापर्यंत अडीचशे तरुणांनी रक्तदान केले आहे. रक्तदानाचे महान कार्य तरुणांमार्फत सुरू असल्याने त्यांच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. तरुणांसाठी प्रेरणास्थान आणि आदर्श राजा असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध मंडळांनी असाच सामाजिक उपक्रम हाती घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.