यापूर्वी दोनवेळा केले होते आंदोलन, कुटुंबीयांची चिंता वाढली
शाम जाधवर / आरंभ मराठी
कळंब – कळंब आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेले सच्चिदानंद अशोक पुरी यांनी गुरूवारी सकाळी 8 वाजता एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बीएसएनएलच्या टॉवरवर चढून आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून, सुमारे 36 तासांपासून ते टॉवरवर बसून असल्याने प्रशासनासह कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
एसटीचे खाजगीकरण करू नये, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशा विविध मागण्यांसाठी गुरुवारी सकाळपासून बीएसएनएलच्या टॉवरवर अंदाजे २२० फूट उंचीवर जाऊन पुरी यांनी आंदोलन सुरु केले आहे. बीएसएनएल कार्यालयाच्या आवारातच हे २६० फूट उंचीचे टॉवर असून एवढ्या उंचीवर जाऊन करत असलेल्या या आंदोलनामुळे स्थानिक प्रशासन मात्र हतबल झाले आहे.
कळंब आगारात वाहक म्हणून काम करणारे सच्चिदानंद अशोक पुरी हे मागील तीन वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत. अशा हटके आंदोलनाची त्यांची ही तिसरी वेळ असून यापूर्वीही त्यांनी कळंब आगारातील एका उंच झाडावर चढून आणि एकदा कळंब शहरातील बीएसएनएल टॉवरवर चढूनही आंदोलन केले होते.
दुर्घटना होऊ नये म्हणून प्रशासनाने अग्निशमन बंब, रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. यावेळी आंदोलनस्थळी नायब तहसीलदार राजेश तापडिया, आगार प्रमुख मिथुन राठोड, मंडळ अधिकारी टी. डी. मटके, तलाठी व्यंकटेश लोमटे व पोलीस निरीक्षक रवी सानप, पोलिस कर्मचारी श्रीराम मायंदे, विनोद चेडे व अन्य पोलिस कर्मचारी याठिकाणी लक्ष ठेऊन आहेत.
मंत्री उदय सामंत यांच्याशी फोनवर चर्चाही निष्फळ –
एसटीच्या वरिष्ठांनी आंदोलक सच्चिदानंद पुरी यांचा उदय सामंत (उच्च व तंत्रशिक्षण मंत्री) यांच्याशी भ्रमणध्वनी वर संपर्क साधून दिला, त्यांनी आंदोलन थांबवण्याची विनंती केली. परंतु यापूर्वीही तुम्ही अशीच आश्वासने दिली होती. आता मुख्यमंत्र्यांशी बोलल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही असा पवित्रा पुरी यांनी घेतल्याचे कळते.
शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यंतही यावर कांहीच तोडगा निघाला नसून दोन दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाचा लढा कसा थांबणार,असा प्रश्न विचारला जात आहे.