आरंभ मराठी / धाराशिव
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे धाराशिव जिल्ह्यात संघटन मजबुतीकरण दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून, उद्यापासून (दि.११) जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रामध्ये पक्ष संघटना बळकट करण्यासाठी वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक व चर्चा सत्रांना सुरुवात होणार आहे.
या दौऱ्याच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाकडून जिल्ह्यातील संघटनात्मक स्थितीचा आढावा घेत नव्याने बांधणी करण्यावर भर दिला जाणार आहे. या दौऱ्यासाठी काँग्रेसचे सचिव राजेश तिवारी, महासचिव तथा धाराशिवचे प्रदेश निरीक्षक हेमंत ओगले, महासचिव व प्रदेश निरीक्षक डॉ. श्रावण रॅपनवाड तसेच प्रदेश काँग्रेसचे सचिव व धाराशिवचे प्रदेश निरीक्षक उदयसिंह पाटील हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
त्यांच्या उपस्थितीत राज्य काँग्रेसचे निरीक्षक, पक्ष पदाधिकारी, विद्यमान व माजी खासदार-आमदार, तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकांतील उमेदवार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
या बैठकीदरम्यान केवळ पक्षीय पदाधिकाऱ्यांपुरती चर्चा मर्यादित न ठेवता, सामाजिक संस्था, नागरी संघटना, पत्रकार आणि व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशीही संवाद साधला जाणार आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध स्तरांवरील मते जाणून घेऊन त्यानुसार पुढील रणनीती आखण्याचा काँग्रेसचा मानस आहे.
दौऱ्याच्या अनुषंगाने धाराशिव शहर व तालुका, परंडा, भूम, वाशी, कळंब, उमरगा, लोहारा आणि तुळजापूर या सर्व तालुक्यांमध्ये ब्लॉक काँग्रेस कमिटी, मंडळ, भूतपूर्व अध्यक्ष, वरिष्ठ नेते, स्थानिक स्वराज्य संस्था व पंचायत सदस्य तसेच कार्यकर्त्यांशी बैठक व संवाद साधला जाणार आहे. या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातील संघटनात्मक ताकद, अडचणी आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा यांचा आढावा घेतला जाईल.
याचबरोबर धाराशिव जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांशी वैयक्तिक चर्चा करून त्यांची मते आणि भूमिका जाणून घेतली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे आगामी काळात जिल्हाध्यक्ष पदाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मागील दशकभरापासून धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसची मोठी वाताहत झाली असून पक्ष संघटना कमकुवत झाली आहे.
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही काँग्रेसला मोठा फटका बसला असून पक्षाची स्थिती चिंताजनक झाली आहे. त्यातच अंतर्गत गटबाजी वाढल्याने पक्षाच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे. सध्याचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या कार्यपद्धतीवरही पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्हाध्यक्ष बदलावा, अशी मागणी मागील काही महिन्यांपासून जोर धरत आहे. विशेष म्हणजे, मागील दोन दशकांपासून धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद एकाच घराण्याकडे असल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. २०१९ पासून धीरज पाटील जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत असून, त्यापूर्वी त्यांचे वडील आप्पासाहेब पाटील यांनी जवळपास १४ वर्षे हे पद सांभाळले होते.
काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला असलेला धाराशिव जिल्हा गेल्या काही वर्षांपासून अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. कालच धाराशिव नगरपालिकेत निवडून आलेले काँग्रेसचे दोन नगरसेवक पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाल्याने पक्षाला आणखी धक्का बसला आहे. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणि गटबाजी उघडपणे समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर होणारा हा संघटन मजबुतीकरण दौरा काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या बैठकीनंतर लवकरच जिल्हा काँग्रेसमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, नव्या आणि तरुण चेहऱ्याला जिल्हाध्यक्ष पदाची संधी मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. काही संभाव्य नावांवर सध्या विचार सुरू असून, पक्षश्रेष्ठींचा दौरा पूर्ण झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यासाठी काँग्रेसकडून नवीन जिल्हाध्यक्षाची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









