आरंभ मराठी / तेर
धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळा शिवारात ढोकी पोलिसांनी मोठी कारवाई करत गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका इसमास गावठी कट्टा व तीन लोखंडी फायटरसह जेरबंद केले आहे. तडवळा शिवारातील रॉयल हॉटेल बार परिसरात एक संशयित इसम बेकायदेशीर शस्त्र घेऊन फिरत असल्याची खात्रीशीर माहिती ढोकी पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे, एस.एस.आय. पुरके आणि पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत लाकाळ यांनी तातडीने धाव घेऊन सापळा रचला.
ही कारवाई शनिवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर धनाजी पवार (रा. तडवळा) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी कट्टा (बंदूक) आणि तीन लोखंडी फायटर जप्त केले. परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने आरोपी शस्तत्रासह फिरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी शासनाच्या वतीने ढोकी पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन ढेकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ज्ञानेश्वर धनाजी पवार याच्याविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ढोकी पोलीस करत आहेत. ढोकी पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे परिसरात कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्यापूर्वीच अनर्थ टळला आहे.











