आरंभ मराठी / धाराशिव
भारतीय जनता पार्टीच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी येथील उद्योजक तथा भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ कुलकर्णी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे.
भाजपच्या जिल्हाध्यक्षपदासाठी 20 ते 22 जण इच्छुक होते. संताजी चालुक्य यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यकाळ अद्याप शिल्लक असल्याने त्यांचीच या पदावर पुन्हा एकदा निवड व्हावी, अशी त्यांची मागणी होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच विविध शाखेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून जिल्हाध्यक्षपदावर दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड केली आहे.
दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी यापूर्वीही पक्षाचे जिल्हाध्यक्षपद सांभाळले आहे. त्यांनी या काळात पक्ष संघटनेसाठी जोरदार काम केले होते. त्यांच्या कामाचा पक्षाला मोठा फायदा झाला होता. पदावर नसतानाही ते पक्ष संघटन वाढीसाठी कार्यरत होते.
केलेल्या कामाची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी बँकिंग क्षेत्रात अल्पावधीत गरुडझेप घेतली. त्यानंतर त्यांनी गुळ पावडर उद्योग उभारून शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. 15 दिवसात शेतकऱ्यांना उसाचे बिल देण्याचे रेकॉर्ड त्यांनी केले असून, दोन कारखान्यांसोबत त्यांनी गुळाच्या पावडरपासून दैनंदिन वापरातील पदार्थ निर्मिती सुरू केली आहे.
त्यांचे व्यवसायिक कौशल्य तसेच समाजकारण, राजकारणातील एकूणच सकारात्मक कार्यपद्धतीचा पक्षाला मोठा फायदा होऊ शकतो.त्यांच्या या निवडीबद्दल आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह पक्षातील अनेक नेत्यांनी,पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.