सलग दुसऱ्या दिवशी फसवणुकीची घटना
आरंभ मराठी / कळंब
मल्टिस्टेट बँकेकडून जास्तीच्या व्याजदराचे आमिष दाखवून मल्टिस्टेट बँकेकडून ठेवीदारांची तब्बल ६१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना कळंब येथे उघडकीस आली आहे. कालच जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात एका मल्टिस्टेट बँकेकडून ठेवीदारांची तब्बल ७२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सलग दोन दिवसात दोन फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्यामुळे खळबळ माजली आहे. दोन गुन्ह्यात मिळून ठेवीदारांच्या १ कोटी ३३ लाख रुपयांना चुना लागल्याचे उघडकीस आले आहे. कळंब येथे दाखल झालेल्या गुन्ह्यात ज्ञानराधा मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बीड या मल्टिस्टेटच्या कळंब येथील शाखेने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंब येथील ढोकी रोडवरील ज्ञानराधा मल्टिस्टेटने जून २०२३ ते ३० जून २०२४ या एक वर्षांच्या काळात ठेवीदारांना जास्त व्याजदराचे आमिष दाखवून ६१ लाख ३२ हजार ८६३ रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादी भागवत लांडगे यांनी म्हटले आहे.
या प्रकरणात शाखाधिकारी बापुराव बाबासाहेब माने (रा. धारुर), चेरअमन- सुरेश ज्ञानोबाराव कुटे, (रा. क्लॉथ सेंटर बीड), व्हाईस चेरअमन- यशवंत वसंतराव कुलकर्णी, वसंत शांताराव सटाले, संचालक, अशिष पद्माकर पाटोदेकर, संचालक, दादाराव हरीदास उंदरे, संचालक, वैभव यशवंत कुलकर्णी, संचालक, कैलास काशीनाथ मोहिते, संचालक, शिवाजी रामभाउ पारसकर, संचालक, रविंद्र मधुकर तल्बे, संचालक,आशा पदमाकर पाटील, संचालक, रेखा वसंतराव सटाले,संचालक, रघुनाथ सखाराम सरसटे, संचालक, रविंद्र श्रीरंग यादव, संचालक, तसेच ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी जि. बीड शाखा कळंब सर्व कर्मचारी या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी संगणमत करुन व आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांची ६१ लाख ३२ हजार ८६३एवढी मुद्दल रक्कम व त्यावरील व्याज परत न करता पैशाचा अपहार करुन फसणुक केली. ठेवीदारांपैकी एक असलेल्या भागवत लांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 420, 409, 406, 120 (ब) सह कलम 3,4 महाराष्ट्र ठेवीदाराच्या वित्तीय संस्था मधील हित संबंधाचे संरक्षणअधिनियम 1999 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. मल्टिस्टेट बँकेकडून फसवणूक झाल्याचा दोन दिवसातला हा दुसरा प्रकार असल्यामुळे यामुळे खळबळ उडाली आहे.
ग्राहकांनो तुमच्या ठेवी सुरक्षित आहेत का ?
जिल्ह्यात अवघ्या दोन महिन्यात 4 मल्टिस्टेटने ग्राहकांना चुना लावला आहे. रातोरात मल्टीस्टेटमधील आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरणे बाहेर येत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या बँकांमध्ये ठेवलेल्या ठेवी सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.