निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरेंना 6 वर्षांसाठी घातली होती मतदानावर बंदी
आरंभ मराठी विशेष / सज्जन यादव
लोकसभा निवडणुकीचा प्रचार पाहता हा सामना फक्त भाजपा आणि शिवसेना (ओरिजिनल) या दोघांतच आहे की काय असं वाटत आहे. राज्यातील काँग्रेसचा एकही नेता या निवडणुकीत दखलपात्र नाही. काही प्रमाणात शरद पवार किल्ला लढवत आहेत. परंतु विरोधकांच्या जहाजाचे खरे कॅप्टन उद्धव ठाकरे आहेत. परवा त्यांनी प्रणिती शिंदे आणि काल सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात केलेली भाषणे भाजपला सळो की पळो करून सोडणारी होती.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणात एकनाथ शिंदे यांच्या सेनेला अनुल्लेखाने मारतात. उद्धव ठाकरे सध्या फक्त मोदी आणि शहा या दोघांनाच भिडत आहेत. एकीकडे देशभर विरोधकांनी नांग्या टाकल्या असताना उद्धव ठाकरे घायाळ सिंहाप्रमाणे त्वेषाने अंगावर जात आहेत. भाजपचे हिंदुत्व किंवा राष्ट्रभक्ती किती बेगडी आहे हे उद्धव ठाकरे यांच्याइतकं ठामपणे दुसरे कोणी सांगू शकत नाही. त्याला काही कारणे आहेत. भाजपाचा महाराष्ट्रातील प्रवास उद्धव ठाकरे यांच्याइतका इतर कोणाला माहिती नाही. हा वाद तेंव्हा वाढला जेंव्हा मोदी-शहा यांनी उद्धव यांच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणून हिनवले. हिंदुत्वाबद्दल भाजपा इतर पक्षांना बोलू शकते परंतु शिवसेनेला बोलू शकत नाही. हिंदुत्वासाठी शिवसेने एव्हढा त्याग दुसऱ्या कुणी केलेला नाही हे नव्या पिढीला आवर्जून सांगावे लागते. हा विषय समजून घेण्यासाठी 37 वर्षे मागे जावे लागते.1987 साली मुंबईतील विलेपार्ले या मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार हंसराज बोहरा यांचे निधन झाले होते. त्यामुळे तिथे पोटनिवडणुक लागली होती. त्याठिकाणी शिवसेनेकडून डॉ रमेश प्रभू, काँग्रेसकडून प्रभाकर कुंटे आणि धर्मनिरपेक्ष जनता पक्षाकडून प्राणलाल व्होरा असे तीन उमेदवार उभे होते. तेंव्हा भाजपची स्थापना होऊन जेमतेम सात वर्षे झाली होती आणि भाजपला राज्यात कुणीही ओळखत नव्हते. त्या निवडणुकीत तिरंगी सामना होता. बीजेपीने त्या निवडणुकीत धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या प्राणलाल व्होरा यांना पाठिंबा दिला होता.
बाळासाहेब ठाकरे यांना कसल्याही परिस्थितीत ही जागा जिंकायची होती. त्या निवडणुकीत बाळासाहेबांनी पहिल्यांदा ‘ गर्व से कहो, हम हिंदू है’ ही घोषणा दिली होती. या एका घोषणेमुळे वातावरण फिरले आणि त्यामध्ये शिवसेनेचे डॉ.प्रभू निवडून आले. काँग्रेसचे उमेदवार प्रभाकर कुंटे यांनी बाळासाहेबांच्या वक्तव्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली. आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेतली आणि धर्माच्या नावावर निवडणूक लढवली म्हणून ती निवडणूकच बाद ठरवली. एव्हढेच नाही तर शिवसेनेचे उमेदवार डॉ.प्रभू यांच्यावर सहा वर्षे निवडणूक लढवण्यावर बंदी घातली. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षासाठी काढून घेतला. पुढचे सहा वर्षे म्हणजेच 1999 ते 2005 या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी मतदान केले नाही. 2007 मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी मतदान केले. या एका प्रकरणामुळे देशातील वातावरण बदलायला सुरुवात झाली. हिंदुत्व या विषय पहिल्यांदा केंद्रस्थानी आला. तेंव्हा भाजपचे महाराष्ट्रातील नेते प्रमोद महाजन यांनी हिंदुत्वाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत युती करण्याचा आग्रह धरला. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रबोधनकार ठाकरे यांचे संस्कार होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका बाळासाहेबांना कधीच मान्य नव्हती. संघाची स्थापना 1925 ची परंतु साठ-पासष्ट वर्षे झाली तरी नागपूर सोडता संघाला हातपाय पसरवतात येत नव्हते. सेनेसोबत युती झाली तर पक्ष वाढेल आणि संघालाही वाढवता येईल या उद्देशाने बाळासाहेब ठाकरे यांना प्रमोद महाजन युती करण्यासाठी प्रयत्न करत होते. बाळासाहेब युती करण्यास तयार नव्हते शेवटी अनेक चर्चा झाल्यानंतर 1989 साली युती झाली. या सर्व घटनेचे साक्षीदार उद्धव ठाकरे आहेत. त्यावेळी ते आता आदित्य ठाकरे ज्या वयाचे आहेत तेव्हढ्या वयाचे होते. म्हणजे त्यांना राजकारण पूर्ण कळत होते. बाळासाहेब ठाकरे हे जरी ब्राम्हण असले तरी ते कायम बहुजनांचे नेते राहिले आहेत. चांदा ते बांदा बाळासाहेबांचे कार्यकर्ते होते. याच सेनेच्या कार्यकर्त्यांचे संरक्षण घेऊन भाजपा आणि संघ यांनी राज्यात हातपाय पसरले. त्यानंतर अयोध्या यात्रा, राममंदिर या मुद्द्यांना घेऊन हिंदुत्व हा विषय भाजपने केंद्रस्थानी ठेवून राजकारण सुरू केले. शिवसेना नावाच्या मोठ्या वृक्षावर बांडगुळ म्हणून जन्मलेला भाजप आज त्याच शिवसेला खाऊन टाकत आहे. प्रबोधनकार, बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व समान आहे, ते धर्मावर आधारित कधीच नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांना जरी ‘हिंदुहृदयसम्राट’ ही उपाधी दिलेली असली तरी मुस्लिम लोक देखील बाळासाहेबांना आदराने हिंदुहृदयसम्राट म्हणत होते. शिवसेनेच्या हिंदुत्वात मुस्लिमांचा द्वेष कधीच नव्हता. ज्या शिवसेनेने भाजपला खांद्यावर घेऊन महाराष्ट्रातील गावागावात पोहोचवले तोच भाजपा आज शिवसेनेला आणि ठाकरे कुटुंबाला नामोहरम करण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करत आहे. राजकारण होत राहील, निवडणूका देखील होत राहतील परंतु इतिहास कधी बदलत नसतो. उद्धव ठाकरे हे एवढे चिडून का बोलत आहेत, त्याला ही कारणे आहेत. नव्या पिढीला हा इतिहास माहिती नाही म्हणून हा लेखनप्रपंच. बाकी मतदार म्हणून प्रत्येक व्यक्ती सुज्ञ आहेच. परंतु काळाच्या पडद्याआड लपलेलं सत्य नव्या पिढीला सांगावे लागते. बाकी राम मंदिर वगैरे या आपल्या अस्मिता आहेत. परंतु ‘हृदयात राम आणि हाताला काम’ हेच आपले खरे हिंदुत्व आहे. हिंदुत्व धर्म नाही जगण्याचा आदर्श मार्ग आहे…..!