प्रतिनिधी / धाराशिव
आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे सण एकाच दिवशी आली असून,या दिवशी मुस्लिम समाजाकडून बकऱ्याची कुर्बाणी दिली जाते. मात्र,राज्यातील काही गावांनी या दिवशी कुर्बाणी न देण्याची भूमिका घेतली आहे. धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील जवळा (नि.) या गावानेही एकादशी दिवशी बकऱ्यांची कुर्बाणी न देण्याचा निर्णय घेतला आहे. गावात सौहार्दाचे वातावरण कायम राहावे,अशी यामागची भूमिका आहे.
जवळा (नि) ग्रामपंचायत कार्यालयात यासंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी हा सर्वानुमते घेण्यात आला. बकरी ईद गुरुवारी साजरी न करता आषाढीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी परांड्याचे पोलीस निरीक्षक भुजबळ यांनी ग्रामस्थांच्या या निर्णयाचे कौतुक केले. ते म्हणाले, कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची सर्वांनीच काळजी घ्यावी. सोशल मीडिया वापरत असताना आक्षेपार्ह मेसेज कोणालाही पाठवू नयेत.
बकरी ईद हा सण मुस्लिम धार्मियांमध्ये पवित्र मानला जातो. परंतु धार्मिक सहिष्णूता राखण्यासाठी कुर्बाणी न देता केवळ नमाज पठण केले जाणार आहे. समाज बांधवात हे धार्मिक ऐक्य दिसून आल्याने मुस्लिम बांधवांच्या या निर्णयाचे तालुक्यात स्वागत केले जात आहे. एकीकडे समाजात धर्मावरून आराजकता माजविण्याचा प्रयत्न होत असताना गावकऱ्यांनी घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद मानला जात आहे.