प्रतिनिधी / तेरखेडा
वाशी तालुक्यातील तेरखेडा आणि परिसरात अजूनही जोरदार पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे पेरणी करायची कशी, मोठा पाऊस कधी पडेल, यावर्षी खरिपाची पेरणी होईल का,अशी शेतकऱ्यांना चिंता लागली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी बियाणे, खतांची खरेदी करून ठेवली आहे. मात्र, पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
जून महिना संपून जुलैचे 4 दिवस लोटले. तरीही परिसरात अजूनही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही.दरवर्षी जुलैमध्ये संपूर्ण पेरणी होऊन पिकांची उगवण झालेली असते. मात्र यावर्षी अत्यंत थोड्या प्रमाणात पाऊस पडत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीची संपूर्ण तयारी करून ठेवली आहे. शेतातील संपूर्ण मशागत झालेली असून खते आणि बी बियाणे यांची जमवाजमव करून शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करत आहेत. आणखी काही दिवसात पाऊस झाला नाही तर खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे. शेतकऱ्यांनी उधारीवर, उसनवारीवर तसेच सावकाराकडून पैशाची जमवाजमव करून खते आणि बी-बियाणांची खरेदी करून ठेवली आहे. यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी कोहिले म्हणाले की, शेतकरी बांधवांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतर जमिनीत ओलावा मुबलक प्रमाणात झाल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी.घाईघाईने पेरणी करू नये, त्यामुळे दुबार पेरणीची वेळ येवून आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच खते आणि बियाणे खरेदी करताना कृषी विभागामार्फत अधिकृतरित्या परवानगी दिलेल्या विक्रेत्याकडूनच खते आणि बियाणे खरेदी करावीत.