स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
५ तारखेपर्यंत कोरडा दुष्काळ जाहीर न केल्यास आंदोलनाचा इशारा
विक्रांत उंदरे / वाशी
प्रत्यक्ष बांधावर जाऊन पावसाच्या दीर्घ खंडाने वाळलेली खरिपाची पिके बघा आणि ५ सप्टेंबरपर्यंत दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा, अन्यथा ६ सप्टेंबर रोजी विराट मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि.१) तहसीलदार नरसिंग जाधव यांना दिला आहे. यावेळी वाळलेले सोयाबीन आणि बेशरमाच्या फुलांचा बुके तहसीलदारांना भेट देऊन अनोखे आंदोलन केले.तसेच सरकारला शेतकऱ्यांच्या भावना कळवाव्यात अशीही मागणी करण्यात आली आहे.
पावसाने तालुक्यात मोठा खंड दिला असून, याचा विपरीत परिणाम तालुक्यातील शेतीवर झाला आहे. खरिपाची पिके संकटात सापडली असून, काही भागातील पिके सुकली आहेत. बहुतांश क्षेत्रावरील पिके वाळून गेली आहेत. याचा सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाच्या क्षेत्राला बसला आहे. पावसाभवी होत चाललेल्या नुकसानीमुळे शेतकरी मानसिक दृष्ट्या खचला असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणतीही उपाययोजना अद्याप केलेली नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंतेत आहेत. पीकविमा मिळण्याची साशंकता, अनुदान नाही, चारा टंचाई, कृषी फिडरला खंडित वीज पुरवठा, प्रोत्साहन अनुदान नाही यासह अनंत अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांचे मनोधैर्य खचू लागले आहे. दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी तालुकाध्यक्ष ऍड वसंत जगताप, गजानन भारती, संजय कवडे, राम घुले, गोरख उंदरे,बाळासाहेब माळी,दत्तात्रय उंदरे,दिलीप गरड, चंद्रकांत चेडे,नानासाहेब उंदरे , चंद्रकांत उंदरे, पांडुरंग घुले, बाळासाहेब नगरे, सुजित उंदरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.