तालुक्यात रब्बीचे क्षेत्र सर्वाधिक, मात्र पाण्याची उपलब्धता न झाल्यास बसू शकतो दुहेरी फटका
दिनेश पोरे / भूम
महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील 70 हजार एकरवरील खरीप पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. पावसाने दडी मारल्याने तालूक्यात दूष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, आगामी काळात पाऊस न झाल्यास खरीप पिके हातची जाऊन रब्बी पेरणीवरही परिणाम होणार आहे.तसेच ग्रामीण भागाला पाणीटंचाईचाही सामना करावा लागेल अशी स्थिती आहे.
भूम हा प्रामुख्याने रब्बी पिकाचा तालुका आहे.वाशी तालुका निर्मितीपूर्वी भूम तालूक्यात एकूण ६ गावे खरीप हंगामाची म्हणून शासन दरबारी नोंद आहे. तालुक्यातील माणकेश्वर, आंबी आदी गावांमध्ये रब्बी ज्वारी, हरभरा, गहू इत्यादी पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात होते. दरम्यान यावर्षी खरीप हंगामात वेळेवर पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी उडीद, मूग अशा पिकांची पेरणी न करता सोयाबीन, तूर या पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. तालुक्यात एकूण २८ हजार २२३ हेक्टरमध्ये म्हणजे 70 हजार एकर पेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीन व तुरीचा पेरा झाला आहे. दरम्यान पेरणीनंतर काही दिवस रिमझिम पाऊस झाला व ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.त्यानंतर महिनाभर पावसाने दडी मारल्याने सोयाबीन व तूर पिकाची वाढ खुंटली आहे. ऑगस्ट महिन्यात प्रामुख्याने सोयाबीन व तुरीस फुले लागण्याची परिस्थिती असते. मात्र पावसाने दडी मारल्याने पिके कोमजून गेली असून, कळी अवस्थेत असणारी फुले गळून पडत असल्याचे शेतकरी दतात्रय मस्कर यांनी ‘आरंभ मराठी’शी बोलताना सांगितले.
दरम्यान, तालुक्यात पोळा सणानंतर रब्बीची पेरणी होते. या अगोदर शेतकरी रब्बी पिकासाठी ठेवण्यात आलेल्या रानाची मशागत करत आहे. तर पावसाअभावी कमी वाढ झालेल्या मूग व उडीद पिकासाठी पावसाच्या प्रतिक्षेत आहे, दरम्यान आणखी ८ ते १० दिवस पाउस न झाल्यास उडीद व मूगावर पाळी घालल्याची वेळ येणार आहे. सध्या तालुक्यात गतवर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची अडचण एक ते दीड महिना जाणवणार नाही.मात्र पाउस न झाल्यास डोंगराळ भागात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावणार आहे.निसर्गाची अवकृपा अशीच राहिल्यास अडचणींचा लवकरच सामना सुरू होऊ शकतो, असे डूक्करवाडीचे रहिवाशी अर्जून मासाळ यांनी सांगितले.