आरंभ मराठी / धाराशिव
प्राचीन लेणींमधून उलगडणारा हजारो वर्षांचा इतिहास, तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची श्रद्धा, नळदुर्ग-परंड्यासारख्या भुईकोट किल्ल्यांचा दिमाख आणि तेरसारख्या प्राचीन नगरीचा सांस्कृतिक वारसा अशा इतिहास, अध्यात्म, संस्कृती आणि निसर्गाच्या समृद्ध वारशामुळे धाराशिव जिल्ह्याची पर्यटन ओळख अधिक व्यापक होत आहे. या वैभवाचे जतन करतानाच पर्यटक व भाविकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी जिल्ह्यातील संरक्षित स्मारके आणि पर्यटनस्थळांच्या विकासाला नियोजनबद्ध गती देण्यात येत आहे. शासनाने धाराशिव जिल्ह्यातील एकूण २९ वास्तू व स्थळांना राज्य संरक्षित स्मारके म्हणून घोषित केले आहे. यामध्ये धाराशिव लेणी, चामर (चांभार) लेणी, शिवगुरू समाधी मंदिर, हजरत समशुद्दीन दर्गा, तेर येथील त्रिविक्रम मंदिर, उत्तरेश्वर मंदिर, संत गोरोबा काकांचे घर, तीर्थकुंड, स्तूप व प्रागैतिहासिक स्थळ, किसन मस्के यांचे शेत, गोविंद लक्ष्मण चारी यांचे शेत, गोविंद माधव लक्ष्मण चारी यांचे शेत, बैराग पांढर, सुलेमान टेकडी, रेणुका टेकडी, गोदावरी टेकडी, कोटक्षेत्र, महार टेकडी व मुलान टेकडी यांचा समावेश आहे.
याशिवाय वडगाव येथील प्रागैतिहासिक (महाअश्मकालीन) स्थळ, जागजी येथील महालक्ष्मी मंदिर व बारव, तुळजापूरचे भवानी मंदिर व लावणी घुमट, नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला, परंडा किल्ला, माणकेश्वरचे महादेव मंदिर, परंडा तालुक्यातील शेंद्री (बु.) येथील प्रागैतिहासिक (महाअश्मकालीन) स्थळ अर्थात शीलावर्तुळ, मुरूम येथील हिंदू मंदिर व शिलालेख, उमरग्याचे महादेव मंदिर आणि सास्तूर येथील घुमट यांचा या संरक्षित वारशात समावेश आहे.
पर्यटन विकासाचा लाभ केवळ संबंधित स्थळाच्या सुशोभीकरणापुरता मर्यादित राहत नाही. पर्यटक व भाविकांची संख्या वाढल्यास स्थानिक वाहतूक, निवास, भोजन, प्रसाद विक्री, हस्तकला, लघुव्यवसाय, बचतगट आणि युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वारसा संवर्धनासोबत पर्यटनस्थळांवरील पायाभूत सुविधांचा विकास हा स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ देणारा ठरू शकतो.
*पाच पर्यटनस्थळांवर १४ कोटी ३४ लाखांची विकासकामे*
जिल्ह्यातील ऐतिहासिक व पर्यटनस्थळांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत गड-किल्ले, मंदिरे आणि महत्त्वाच्या संरक्षित स्मारकांच्या संवर्धनासाठी १४ कोटी ३४ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून जिल्ह्यातील पाच पर्यटनस्थळांच्या विकासाची कामे सुरू असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाने दिली.
यामध्ये तुळजापूर येथील घाटशीळ मंदिर, वडगाव (देव) येथील खंडोबा मंदिर, धाराशिव लेणी, चामर लेणी आणि नळदुर्ग किल्ला (भाग-२) यांचा समावेश आहे.
*आणखी तीन स्थळांच्या विकासाचे प्रस्ताव*
पर्यटन विकासाची ही वाटचाल पुढे नेत उपळा येथील त्रिकुटेश्वर मंदिर, तेर येथील मुलानी टेकडी आणि धाराशिव येथील शिवगुरू समाधी या तीन स्थळांच्या विकासाची कामे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) निधी योजनेंतर्गत प्रस्तावित करण्यात आली आहेत. ही कामे प्रत्यक्षात आल्यास जिल्ह्यातील आणखी महत्त्वाच्या ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळक स्थान मिळण्यास मदत होणार आहे.






