आरंभ मराठी / धाराशिव
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला राज्य सरकारकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मराठा समाजाकडून सरकारप्रती रोष व्यक्त होत आहे. त्यातच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त उदय होणाऱ्या ध्वजारोहणाला विरोध केला जात आहे. यावर पालकमंत्री सरनाईक यांनी मराठा समाजाला आवाहन केले आहे. धाराशिवचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, समाजाच्या भावनांशी निगडित सुमारे १५० फुटी भगव्या ध्वजाची उभारणी तसेच मराठा समाज मंदिराच्या उभारणीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता समाजाच्या प्रश्नांवर संघर्षाबरोबरच संवाद, विकास आणि प्रत्यक्ष कृतीला प्राधान्य देण्याची गरज आहे. मराठा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला असून, आता शेतकऱ्यांच्या बांधावर उतरून काम करण्याची वेळ आली आहे, असे मत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले. पालकमंत्री म्हणून धाराशिवमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतर मराठा समाजाच्या भावना आणि अपेक्षा नेहमीच महत्त्वाच्या राहिल्या आहेत. समाजाने मांडलेल्या मागण्यांपैकी भगवा ध्वज आणि मराठा समाज मंदिर या महत्त्वाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष काम सुरू केले आहे. हा केवळ विकासकामांचा विषय नसून, समाजाच्या भावनांचा सन्मान करण्याचा प्रयत्न असल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबरोबरच शेतकऱ्यांच्या अडचणी प्रभावीपणे मांडल्या आहेत, असा संदर्भ देत सरनाईक म्हणाले की, शेतकरी हा मराठवाड्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ कागदावर समजून घेऊन चालणार नाही, तर त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन त्या समजून घेतल्या पाहिजेत.
जरांगे-पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत केलेल्या सूचनेनुसार आता सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणार असून, त्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भूमिकाही सरनाईक यांनी मांडली. १७ सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. निजामाच्या राजवटीतून मराठवाड्याच्या मुक्तीसाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्याग, संघर्ष आणि बलिदानाचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. त्यामुळे या ऐतिहासिक दिवशी समाजात कटुता निर्माण होईल किंवा सामाजिक वातावरणावर परिणाम होईल, अशा कोणत्याही कृती टाळण्याची गरज असल्याचे सरनाईक यांनी म्हटले. धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यावर दुष्काळाचे गंभीर सावट आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अत्यंत साधेपणाने आणि कोणताही गाजावाजा न करता साजरा करावा, असे निर्देश पालकमंत्री सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. कार्यक्रमासाठी कोणीही हार-तुरे अथवा पुष्पगुच्छ आणून सत्कार करू नये. तसेच फटाके अथवा वाद्यांच्या गजरात कोणत्याही मिरवणुका काढू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मराठा समाजाच्या भावना मला समजतात. समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, धाराशिवची सामाजिक एकजूट आणि मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामाची गौरवशाली परंपरा अबाधित राहावी, हीच इच्छा आहे. त्यामुळे १७ सप्टेंबरच्या पवित्र दिवशी कोणताही गैरसमज अथवा कटुता निर्माण होऊ नये, यासाठी समाजबांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.










