आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उघडपणे समोर आली आहे. विधान परिषदेवर निवडून आलेले नवनियुक्त आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमुळे पक्षातील अंतर्गत मतभेदांना पुन्हा एकदा वाचा फुटली आहे. निमंत्रण पत्रिकेत भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
उद्या (दि.२) धाराशिव येथे भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. व्यंकटराव गुंड यांच्या पुढाकाराने आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नावे आहेत. मात्र, भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील तसेच त्यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांची नावे निमंत्रण पत्रिकेत नसल्याने पक्षातील गटबाजी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
विशेष म्हणजे या निमंत्रण पत्रिकेत खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनाही स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे राणा पाटील यांचे नाव वगळण्यात आल्याने यामागे नेमके काय कारण आहे, याची चर्चा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. यापूर्वी उमरगा येथे झालेल्या आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव नव्हते. त्यामुळे ही केवळ योगायोगाची बाब नसून पक्षातील अंतर्गत मतभेद अधिक तीव्र होत असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या धाराशिव दौऱ्यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे यांनी आपल्याला मंत्र्यांची भेट घेऊ दिली नसल्याची तक्रार करत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनीही पक्षातील मूळ कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचे स्पष्टपणे सांगत नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, वाढत्या अंतर्गत नाराजीच्या पार्श्वभूमीवर काल भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी कार्यकर्त्यांना पक्षातील मतभेद आणि नाराजी सोशल मीडियावर व्यक्त करण्याऐवजी पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावर मांडण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्यानंतर अवघ्या एका दिवसात सत्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून पुन्हा एकदा अंतर्गत वाद समोर आल्याने जिल्हाध्यक्षांच्या आवाहनाला फारसे यश आले नसल्याचे दिसून येत आहे.
एकामागून एक घडणाऱ्या घटनांमुळे धाराशिव जिल्ह्यातील भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे.









