आरंभ मराठी / जेजुरी
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड येथे मुक्काम करून सोमवारी सकाळी जेजुरीकडे प्रस्थान करत असताना बेलसर टोलनाक्याजवळ भीषण अपघात झाला. भरधाव ट्रक वारकऱ्यांच्या दिंडीत पाठीमागून घुसल्याने तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर २० वारकरी जखमी झाले. त्यापैकी चार महिलांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर जेजुरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेआठच्या सुमारास दिंडी बेलसर टोलनाक्यापासून जेजुरीच्या दिशेने सुमारे ५०० मीटर अंतरावर मार्गस्थ होती. रस्त्याच्या एका बाजूने वारकरी हरिनामाचा गजर करत चालले होते, तर दुसरी बाजू वाहनांच्या वाहतुकीसाठी खुली ठेवण्यात आली होती. दिंडीसोबत शिधा, कपडे आणि इतर साहित्य घेऊन जाणारे टेम्पो व ट्रकही समांतर मार्गाने पुढे जात होते. याचवेळी एमएच-४३ ई-४९०८ क्रमांकाचा ट्रक अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन दिंडीच्या पाठीमागून वारकऱ्यांमध्ये घुसला. भरधाव ट्रकने सुमारे २० वारकऱ्यांना फरफटत नेल्याने घटनास्थळी एकच आक्रोश उसळला. काही क्षणांपूर्वी हरिनामाच्या गजराने दुमदुमणारा परिसर अचानक किंकाळ्या आणि रडण्याच्या आवाजाने हादरून गेला.
अपघाताची माहिती मिळताच दिंडीतील स्वयंसेवक, स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बाहेर काढून उपचारासाठी हलविण्यात आले. गंभीर जखमी सात वारकऱ्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापैकी राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे आणि नंदा पवार या तीन महिला वारकऱ्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या तिघीही सांगली जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातातील ट्रक हा नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील एका दिंडीतील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ट्रकचा चालक सुमारे ७० वर्षांचा असून त्याला ताप आल्याने सोमवारी सकाळी औषधांच्या गोळ्या घेतल्याची माहिती आहे. त्या औषधांमुळे त्याला ग्लानी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
अपघातानंतर संतप्त झालेल्या काही नागरिकांनी ट्रक चालकाला बेदम मारहाण केली. मात्र, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून चालकाला जमावाच्या तावडीतून सोडवत ताब्यात घेतले. दरम्यान, अपघातानंतर जखमी वारकऱ्यांना रुग्णालयात नेण्यासाठी सुमारे २० मिनिटे रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने जखमींचे मोठे हाल झाले. अखेर घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचल्यानंतर जखमींना जेजुरी येथील रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. तसेच मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. या दुर्दैवी घटनेमुळे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यावर शोककळा पसरली असून, राज्यभरातून वारकरी व भाविकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.









