माजी नगराध्यक्ष तथा सेनेचे सहसंपर्कप्रमुख मकरंद राजे निंबाळकर यांनी घेतली खासदार राऊत यांची भेट
प्रतिनिधी / धाराशिव
अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो,असा मोलाचा विचार शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी दिला असून, अन्यायाविरुद्ध लढा देण्याची प्रेरणा देणारे भारताचे फायरब्रॅंड नेते व शिवसैनिकांचे आधारस्तंभ असलेले खासदार संजय राऊत आमच्यासाठी ऊर्जेचा स्त्रोत आहेत, अशी भावना माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख मकरंद राजे निंबाळकर यांनी व्यक्त केली. त्यांनी राऊत यांची मंगळवारी मुंबई येथे भेट घेतली.त्यानंतर आपली भावना व्यक्त केली.
मकरंद राजे यांची नुकतीच पक्षाच्या सहसंपर्कपदी निवड झाली असून, पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवल्याबाबद्दल खासदार राऊत आणि उपनेते नेरुरकर यांची भेट घेतली आणि आभार मानले. मकरंद राजे म्हणाले, राऊत यांची भेट ही माझ्यासाठी कायमच वैचारिक पर्वणीची ठरली आहे. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. अवघ्या काही मिनिटांमध्ये आज त्यांनी अमूल्य असा राजकीय विचार दिला. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. सर्वांनी मला धाराशिवच्या सहसंपर्कप्रमुखपदाची जी जबाबदारी दिली आहे, ती मी निष्ठेने पार पाडील व संघटनेसाठी रात्रीचा दिवस करेल, असा शब्द दिला. यासोबतच त्यांनी शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरूरकर यांची देखील सदिच्छा भेट घेतली. या कठीण काळामध्ये हे पद सांभाळणे तसे आवहानात्मक आहे. परंतु त्यावर खूप चांगल्या पद्धतीने चर्चा झाली व यातून नवी ऊर्जा मिळाली. याप्रसंगी संघटनेचा प्रचार, प्रसार करण्याच्या अनुषंगाने विविध मुद्यांवर सखोल चर्चा केली. या सर्व चर्चेचा केंद्रबिंदू माझा प्रत्येक शिवसैनिक आहे,असे मकरंद राजे म्हणाले.