प्रतिनिधी / वाशी
वाशी शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरात म्हणजे जुन्या बसस्थानकाजवळ रविवारी सायंकाळी सहायक पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा मारून सुमारे पावणेअकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात 24 आरोपी निष्पन्न झाले असून, त्यांच्याकडून 23 मोबाईल,12 दुचाकी, पत्त्यांचे सुमारे 255 बॉक्स, रोख 99 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. कळंबच्या सहायक पोलीस अधीक्षक रमेश यांनी कारवाई केल्यानंतरच या जुगार अड्ड्याचा छडा लागला. मात्र, स्थानिक पोलिसांना हा अड्डा इतके दिवस कसा दिसला नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे. या व्यवसायात काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असल्याने पोलिसांनी आजवर कारवाईत टाळाटाळ केल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कळंबचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी रविवारी सायंकाळी वाशी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर तथा जुने बस स्थानक परिसरात जुगार अड्ड्यावर छापेमारी करून 24 जुगाऱ्याना ताब्यात घेतले. त्यांना वाशी पोलीस ठाण्यापर्यंत चालवत नेले. कारवाईसाठी पोलीसांच्या 3 गाड्यांमध्ये ताफा तैनात आणला गेला होता. त्यामुळे ही कारवाई नियोजित होती,हे स्पष्ट आहे. मात्र,एवढ्या मोठ्या संख्येने जुगारी आढळलेल्या अड्ड्याची माहिती स्थानिक पोलिसांना नव्हती का, की पोलिसांची डोळेझाक होती,असा प्रश्न विचारला जात आहे. वाशी शहरात पोलिसांनी आतापर्यंत केलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. विशेष म्हणजे काही राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही यात सहभागी होते,अशी चर्चा आहे.
कळंबवरून आणला बंदोबस्त
वाशीतील कारवाईसाठी एम.रमेश यांनी काही प्रमाणात कळंब पोलीस ठाण्यातून बंदोबस्त आणला होता.यात कळंब येथील पोउपनि पुजरवाड, पोकॉ फतेपुरे, तारळकर,पोन सय्यद, पोहेकॉ चाफेकर, पोना जाधव तसेच वाशी पोलीस ठाण्यातील पोना शेख, भांगे, पोकॉ पठाण, पोकॉ खांडेकर, पो गरड, पोकॉ राउत, पोकों चव्हाण, तसेच सपोनि ससाणे,पोहेकॉ लोंढे, पोना लाटे, पोना यादव, पोकॉ सय्यद, पोकॉ सुरवसे, पोकॉ भैरट, पोकॉ वारे, पोकॉ घुले यांचा समावेश होता.