आरंभ मराठी / धाराशिव
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता. धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 55 गटासाठी आणि पंचायत समितीच्या 110 गणासाठी जवळपास एक हजार उमेदवारी अर्ज दाखल झाले असून ,या अर्जावर छाननी सुरू झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या 55 गटासाठी 489 तर पंचायत समितीच्या 110 गणासाठी 495 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या सर्व अर्जांची आज छाननी सुरू आहे. परंतु एकदा बाद झालेल्या अर्जावर आता उमेदवारांना अपील करता येणार नाही. कारण नवीन नियमानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. महायुती सरकारने राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता.
राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, 1961 च्या कलम 14 (2) मध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली. यामुळे जिल्हा परिषद, पंचायती समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जाशी संबंधित मुद्यांवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम राहणार आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियमातील कलम 14 मध्ये, पोट-कलम (2) अंतर्गत उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्रे) स्वीकारणाऱ्या किंवा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयासमोर अपील दाखल करता येत होते. परंतु, ती संधी आता उमेदवारांना मिळणार नाही. या निर्णयानुसार आज कोणत्या उमेदवाराचा अर्ज बाद होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









