आरंभ मराठी / धाराशिव
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून आता उमेदवारांची हळूहळू गर्दी दिसून येत आहे. धाराशिव तालुक्यातील 12 जिल्हा परिषद गट आणि 24 पंचायत समिती गणांसाठी सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज खरेदी करण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 16 जानेवारी 2026 पासून सुरु झाली असली तरी, पहिल्या दोन दिवसांत, म्हणजे 16 आणि 17 जानेवारी रोजी, कोणतेही अर्ज दाखल झाले नव्हते. मात्र सोमवारी, 19 जानेवारी रोजी, धाराशिव तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी 2 आणि पंचायत समितीसाठी 2 असे एकूण 4 नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत.
सध्या धाराशिव तालुक्यातील उमेदवारांनी 134 जणांनी एकूण 268 नामनिर्देशनपत्रे खरेदी केली आहेत. यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही स्तरातील उमेदवारांचा समावेश आहे. तसेच, धाराशिव पंचायत समितीमध्ये उमेदवारांनी बेबाकी प्रमाणपत्र घेण्यासाठी मोठी गर्दी केली असून, आतापर्यंत 250 इच्छुक उमेदवारांनी प्रमाणपत्र प्राप्त केले आहेत.
मंगळवार (20 जानेवारी) आणि बुधवार (21 जानेवारी) या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वाधिक गर्दी होणार आहे, कारण या दोन दिवसांनंतर नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यामुळे धाराशिव तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.









