आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांची मोठी हालचाल सुरू असून, पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्जांची विक्रमी खरेदी झाल्याचे चित्र दिसून आले आहे.
मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्ज खरेदी झाले असतानाही आजच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज प्रत्यक्ष दाखल झालेला नाही. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधून एकूण ५२६ इच्छुक उमेदवारांनी तब्बल १,२२२ उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. यामध्ये धाराशिव तालुक्यातील १६८ इच्छुकांनी ३२० अर्ज खरेदी केले असून ही संख्या सर्वाधिक आहे.
त्याखालोखाल तुळजापूर तालुक्यातील ५५ इच्छुकांनी २०५ अर्ज, कळम तालुक्यातील ७७ इच्छुकांनी २१७ अर्ज, उमरगा तालुक्यातील ४२ इच्छुकांनी ९८ अर्ज, परंडा तालुक्यातील ३७ इच्छुकांनी १०५ अर्ज, वाशी तालुक्यातील २६ इच्छुकांनी ४९ अर्ज, लोहारा तालुक्यातील ६५ व्यक्तींनी १०८ अर्ज तर भूम तालुक्यातील ६६ इच्छुकांनी १२० उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दिनांक २१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. मात्र, दिनांक १८ जानेवारी रोजी रविवारची सुट्टी असल्याने प्रत्यक्षात उमेदवारांकडे अर्ज दाखल करण्यासाठी केवळ चारच दिवस उपलब्ध आहेत. त्यामुळे सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तीन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संबंधित कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
सध्या विविध पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, युती – आघाडीच्या चर्चा, उमेदवारी निश्चिती यावर भर दिला जात असून, त्यामुळे अनेक इच्छुकांनी खबरदारी म्हणून एकापेक्षा अधिक अर्ज खरेदी केले आहेत. पुढील काही दिवसांत अर्ज दाखल होण्याच्या प्रक्रियेला वेग येणार असून, जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापणार आहे.








