प्रतिनिधी | महाराष्ट्र : अत्यंत दुर्मिळ अशा ब्रेन इटिंग अमीबाने भारतात आणखी एक बळी घेतला आहे. या अमिबामुळे केरळमधील एका १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी खबरदारीचा इशारा दिला आहे.
अलप्पुळा जिल्ह्यातील पनावल्ली गावात हा मुलगा राहत होता. अंघोळ करत असताना नाकावाटे हा अमिबा या मुलाच्या शरीरात गेला. यानंतर या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. राज्याच्या आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी याबाबत माहिती दिली.
हा अमिबा दूषित पाण्यामध्ये आढळतो, असं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं. यासोबतच आरोग्य विभागाने लोकांना दूषित पाण्यात अंघोळ करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. राज्यात यापूर्वी देखील अशी पाच प्रकरणे समोर आली असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
काय आहेत लक्षणं?
या अमिबाची लागण झाल्यास डोकेदुखी, ताप, मळमळ, उलट्या अशी लक्षणं दिसतात. अशा प्रकारचा आजार होणं हे दुर्मिळ असलं, तरी याचा मृत्यूदर ९७ ते १०० टक्के आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता, खबरदारी घेण्याचा इशारा केरळच्या आरोग्य विभागाने दिला आहे.
मेंदू खाणाऱ्या अमिबाचा भारतात बळी; केरळमध्ये १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू! नाकावाटे गेला शरीरात यापूर्वी २०१६ साली अलाप्पुळाच्या तिरुमला वॉर्डमध्ये प्रायमरी अमिबिक मेनिंगोएन्सेफलायटिसचा (पीएएम) पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर २०१९ आणि २०२० साली मलप्पुरम जिल्ह्यात दोन रुग्ण आढळले होते. २०२० मध्येच कोळिकोड आणि २०२२ साली थ्रिसूर जिल्ह्यात एक रुग्ण आढळला होता. या सर्व रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचंही जॉर्ज यांनी सांगितलं.