आरंभ मराठी / धाराशिव
शिवसेनेचे नेते, माजी मंत्री आ. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या कुटुंबात पुन्हा एकदा दरी निर्माण झाली आहे. काही महिन्यापूर्वी त्यांचे बंधू प्रा.शिवाजीराव सावंत यांनी वेगळी भूमिका घेतली होती. धाराशिव जिल्ह्यातील राजकारण आणि अर्थकारणाचा गाडा सांभाळणारे त्यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती धनंजय सावंत हे आता डॉ. तानाजीराव सावंत यांच्यापासून वेगळे होण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वीच सोनारी येथील बंगल्यावर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन स्वतंत्रपणे लढण्याबाबत संवाद साधला. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
आमदार डॉ. सावंत यांनी 15 वर्षापूर्वी परांडा तालुक्यातील सोनारीच्या साखर कारखान्यापासून जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश केला होता. आता त्याच कारखान्यासमोरील बंगल्यातून डॉ. सावंत यांच्याविरोधात तोही घरातूनच शह देण्याची तयारी सुरू झाली असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
धनंजय सावंत हे डॉ. तानाजीराव सावंत यांचे पुतणे असून, त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे ताब्यात घेतली होती. अंतिम निर्णय डॉ. सावंत हेच घेत असले तरी संघटनात्मक पातळीवर धनंजय सावंत यांच्या माध्यमातूनच सगळी सूत्रे हलत होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी दोघांमध्ये बेबनाव निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर विधानसभेत डॉ. सावंत यांचा निसटत्या मतांनी विजय झाला. परिणामी, डॉ. सावंत यांनी मतदारसंघाकडे पाठ फिरवली.
त्यांची मतदारांवर जेवढी नाराजी होती तेवढीच नाराजी कुटुंबातील व्यक्तींवर देखील होती, हे उघड झाले होते. त्यानंतर अतिवृष्टी झाल्यानंतर आ. सावंत यांनी मतदारसंघात बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दौरा केला. या दौऱ्यात धनंजय सावंत मतदारसंघात स्वतंत्रपणे फिरत असल्याचे दिसून आले. त्यानंतर सोनारीच्या भैरवनाथ साखर कारखान्यापासून शिवशक्ती, तेरणा आणि इंदापूरच्या नृसिंह कारखान्यापर्यंत एकाही कारखान्याच्या मोळी टाकण्याच्या समारंभात धनंजय सावंत दिसले नाहीत.
एवढेच नाही तर त्यांची भूमिका ही त्यांचेच दुसरे बंधू केशव सावंत यांनी पार पाडली. विशेष म्हणजे केशव सावंत यांनी केलेल्या कामगिरीचे आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी जाहीरपणे कौतुक केले. त्यामुळे धनंजय सावंत हे नाराज असल्याचे लपून राहिले नव्हते. आता धनंजय सावंत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगळी भूमिका घेण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
एकीकडे आमदार तानाजीराव सावंत यांनी भाजपविरोधात रान उठवून सर्वपक्षीय मोट बांधण्याचे सूतोवाच तेरणा कारखान्यावर झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात केले होते तर सूत्रांच्या माहितीनुसार धनंजय सावंत हेच आता भाजपच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे भाजपकडून सावंत यांना कुटुंबापासूनच धक्का देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.
येत्या काही दिवसांत सावंत कुटुंब हे जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरणार हे निश्चित.
सावंतांच्या बंगल्यावर शिवसेनेचे पदाधिकारी ?
धनंजय सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सोनारीच्या कारखान्यासमोरील बंगल्यावर बैठक घेतली. या बैठकीत शिवसेनेचे काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित असल्याची चर्चा आहे.जवळपास 300 प्रमुख कार्यकर्ते देखील या बैठकीला उपस्थित असल्याने धनंजय सावंत यांच्या भूमिकेला शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांचाही पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे.
जवळा गटात स्वतंत्र प्रचार ?
परांडा तालुक्यातील निजाम जवळा जिल्हा परिषद गटात धनंजय सावंत यांनी काही दिवसापासून तयारी सुरू केली असून, त्यांनी या गटातून स्वतंत्रपणे लढण्याबाबत चाचपणी केली. त्यांच्या दौऱ्यासंबधीच्या बॅनरवर आमदार शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य नेत्यांचे फोटो आहेत मात्र डॉ. तानाजीराव सावंत यांचे फोटो वगळण्यात आले आहेत. त्यामुळे बंडाच्या चर्चेला जोर आला आहे.









