‘आरंभ मराठी’ च्या पाठपुराव्यामुळे हजारो शेतकऱ्यांचा पीक विमा वाचला
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील तब्बल १२ हजारांहून अधिक सामायिक खातेदार शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळाला असून, दैनिक ‘आरंभ मराठी’ च्या सातत्यपूर्ण आणि आक्रमक पाठपुराव्यामुळे पीक विमा कंपनीला माघार घ्यावी लागली आहे. खरीप २०२५ हंगामातील पीक विम्याचे अर्ज अचानक रद्द करणाऱ्या आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीने अखेर निर्णय बदलत सर्व अर्ज वैध ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सामायिक खातेदारांना न्याय मिळाला असून, सामायिक खातेदारांकडून तसेच सीएससी चालकांकडून दैनिक आरंभ मराठीचे आभार मानण्यात येत आहेत.
आयसीआयसीआय लोम्बार्ड पीक विमा कंपनीने नोव्हेंबर २०२५ मध्ये धाराशिव जिल्ह्यातील १२,५७५ सामायिक खातेदारांचे पीक विमा अर्ज अचानक बाद केले होते. कोणतीही पूर्वसूचना न देता घेतलेल्या या निर्णयामुळे हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. या अन्यायकारक निर्णयावर दैनिक ‘आरंभ मराठी’ ने दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी ‘सामायिक खातेदारांवर पीक विमा कंपनीकडून अन्याय’ असे वृत्त प्रकाशित करून प्रकरणाला वाचा फोडली होती.
या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पीक विमा कंपनीला कायदेशीर कारवाईचा इशारा देत सामायिक खातेदारांचे अर्ज रद्द न करता वैध ठरवण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. दिनांक २२ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीतही विमा कंपनीला तशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही तब्बल पंधरा दिवस कंपनीकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. पीक विमा कंपनीच्या या मनमानी कारभाराविरोधात आरंभ मराठीने पुन्हा आक्रमक भूमिका घेत दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी ‘विमा कंपनीची मनमानी सुरूच; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही सामायिक खातेदारांचा निर्णय नाहीच’
या मथळ्याखाली ठळक बातमी प्रसिद्ध केली होती.
या वृत्ताचा तात्काळ परिणाम होत दुसऱ्याच दिवशी, दिनांक १२ जानेवारी रोजी आयसीआयसीआय लोम्बार्ड पीक विमा कंपनीने रद्द केलेले सर्व १२,५७५ अर्ज वैध ठरवण्याचा निर्णय घेतला. याबाबतची अधिकृत सूचना कंपनीकडून सर्व सीएससी केंद्र चालकांना देण्यात आली आहे. अर्जांमधील तांत्रिक त्रुटी दूर करून हे सर्व अर्ज अंतिमतः वैध करण्यात येणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
दैनिक आरंभ मराठीच्या निर्भीड पत्रकारितेमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्ज वैध ठरल्यानंतर सामायिक खातेदार शेतकरी तसेच सीएससी चालकांकडून आरंभ मराठीचे आभार व्यक्त केले जात आहेत.









