आरंभ मराठी / धाराशिव
राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर व जानेवारी महिन्याचे हप्ते मकर संक्रांतीच्या सणानिमित्त एकत्रितपणे वितरित करण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र, राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू असल्याने आणि त्यासाठीचे मतदान उद्या बुधवार, दि. १५ जानेवारी रोजी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यास विरोध दर्शविला.
निवडणूक आचारसंहिता लक्षात घेता, राज्य सरकारकडून आज बुधवारपासून केवळ डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे. मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महिलांना ही गोड भेट दिली असून आज व उद्या अशा दोन दिवसांत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे.
दरम्यान, यापूर्वी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता केवळ सुमारे ६० टक्के लाभार्थी महिलांनाच वितरित करण्यात आला होता. उर्वरित सुमारे ४० टक्के महिला विविध कारणांमुळे नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यापासून अद्याप वंचित राहिल्या आहेत. त्यामुळे या महिलांमध्ये नाराजीचे वातावरण होते. आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणास सुरुवात झाल्याने, ज्या महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, त्यांना नोव्हेंबर व डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी लाभार्थी महिलांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळावा यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे. एकूणच, निवडणूक आयोगाच्या निर्देशांमुळे जानेवारी महिन्याचा हप्ता सध्या स्थगित ठेवण्यात आला असला, तरी मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने राज्य सरकारकडून महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देत दिलासा देण्यात आला आहे. पुढील काळात निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे.









