आरंभ मराठी / धाराशिव
शाळा, महाविद्यालयीन परिसर असलेल्या आणि मुली-महिलांची छेडछाड, हाणामारीच्या घटना सातत्याने घडणाऱ्या शहरातील जिजाऊ चौक भागात मोठ्या प्रयत्नाने पोलिस चौकी मंजूर करण्यात आली.
पोलिस चौकीमुळे या भागात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मदत होईल अशी अपेक्षा होती. मात्र, ही पोलिस चौकी सध्या शोभेची बाहुली बनली आहे. पोलिस चौकीमध्ये चोवीस तास पोलिस कर्मचारी उपस्थित असणे अपेक्षित असताना केवळ रेकॉर्डवर चार पोलिस कर्मचारी उपस्थित असतात प्रत्यक्षात मात्र पोलिस चौकीमध्ये एकही कर्मचारी उपस्थित नसतो. त्यामुळे या पोलिस चौकीचा नेमका उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील जिजाऊ चौक हा शैक्षणिक परिसर असून, या भागात शहरातील प्रमुख खासगी शैक्षणिक संस्था, खासगी कोचिंग क्लासेस आहेत. विद्यार्थ्यांच्या गर्दीने कायम गजबजलेला हा परिसर गेल्या काही वर्षांपासून टवाळखोरी वाढल्याने मुलींसाठी असुरक्षित मानला जात आहे. दुचाकीवरून येणाऱ्या काही टवाळखोरांकडून महाविद्यालयीन, शाळकरी मुलींची छेड काढण्याचे प्रकार वाढले असून, त्यातून तरूणांच्या गटागटांमध्ये हाणामारीच्या घटना घडत आहेत.
याच मार्गावर बसस्थानकापर्यंत टवाळखोरी आणि छेडछाड वाढल्याने मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी या भागात रोडरोमिओ प्रतिबंधक पथकामार्फत सुरक्षित वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला तरी या भागात कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त राहण्यासाठी पोलिस चौकीची गरज व्यक्त केली जात होती.
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या मुद्यावर विधान परिषदेत तारांकित प्रश्न केला होता. तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयाला पत्रव्यवहार करून पोलिस चौकी उभारण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे पोलिस महासंचालकांनी पोलिस दलाकडून अहवाल मागविला होता. त्यानुसार पोलिस चौकीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
त्यात पोलिस विभागाने तीन वर्षातील गुन्ह्यांचा तपशील, वाढती वाहतूक, अन्य पोलिस ठाण्यांवर वाढत असलेला ताण आणि एकूणच पोलिस चौकीची गरज याबाबतची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर मागील सहा महिन्यांपूर्वी जिजाऊ चौक पोलिस चौकी कार्यान्वित करण्यात आली. या पोलिस चौकीसाठी जवळपास दहा लाख रूपयांचा खर्च करण्यात आलेला आहे. मात्र, या ठिकाणी पोलिस चौकी केवळ शोभेची बाहुली म्हणून उभी करण्यात आलेली आहे.
या पोलिस चौकीच्या हद्दीत आनंदनगर आणि शहर पोलिस स्टेशनचाही काही भाग येतो. त्यामुळे दोन्ही पोलिस ठाण्याचे दोन दोन कर्मचारी असे एकूण चार कर्मचारी पोलिस चौकीत दररोज नियुक्त करावेत असे आदेश आहेत. परंतु, प्रत्यक्षात मात्र या चौकीत दिवसभर एकही कर्मचारी उपस्थित राहत नाहीत. आनंदनगर आणि शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी देखील या पोलिस चौकीकडे फिरकत नाहीत ही गंभीर बाब आहे.
सध्या या भागात राज्य मार्गाचे काम सुरू असल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होऊन वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. तसेच महाविद्यालयीन तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर गँगवॉर सुरू आहे. पंधरा दिवसांपूर्वी एक तरुण कोयता घेऊन भर रस्त्यात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता.
यातून काही अघटीत घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असेल? ज्यांच्या प्रयत्नामुळे पोलिस चौकी मंजूर झाली ते सुरेश धस भाजपचे आमदार आहेत. सध्या सरकार भाजपचे असून, गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असताना पोलिसांकडून पोलिस चौकीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.









