आरंभ मराठी / धाराशिव
छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय रिऍलिटी शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पाचही सीझन लोकप्रिय झाल्यानंतर या सीझनबद्दल देखील प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सर्वांचा लाडका भाऊ, अभिनेता रितेश देशमुख याच्या दमदार सूत्रसंचालनामुळे या शोची लोकप्रियता आणखी वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या बिग बॉस मराठी ६ च्या स्पर्धकांच्या प्राथमिक यादीची चाचणी सुरू असून यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील दोन तरुणांची नावे चर्चेत असल्याचे समजते. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या तरुणांचे व्हिडिओ, त्यांची बोलण्याची शैली आणि त्यांची अनोखी ब्रँड ओळख यामुळेच चॅनलच्या लोकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले आहे. त्यातील पहिले नाव आहे नागेश मडके यांचे. “क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर!” असे म्हणून ढवारा मटणाची थाळी राज्यभर पोहोचवणारे हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके आज प्रत्येकाच्या जिभेवरचे नाव आहे. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ लाखोंच्या व्ह्यूज घेतात. त्यांची सहज, साधी आणि हास्यविनोदाची बोलण्याची शैली बिग बॉसच्या घरात रंगत आणू शकते, असा अंदाज असल्याने चॅनलला ते हवे आहेत. दुसरी व्यक्ती आहे लक्ष्मण भोसले.
लक्ष्मण भोसले (हॉटेल तिरंगा)
“नाद करती काय? यायलाच लागतंय!” असे दमदार डायलॉग मारत सोशल मीडियावर झळकलेले लक्ष्मण भोसले देखील संभाव्य स्पर्धकांमध्ये आहेत. त्यांच्या व्हिडिओंना मिळणारा जबरदस्त प्रतिसाद यामुळे ते बिग बॉसच्या घरातील हॉट टॉपिक ठरू शकतात. याशिवाय रितेश देशमुख त्याच्या जिल्ह्यातील एका तरुणाला संधी देऊ शकतो त्याचे नाव आहे रवी काळे. रवी काळे (हॉटेल जलपरी)
“खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही!” असे म्हणत घराघरात पोहोचलेले रवी काळे यांचे व्हिडिओ विशेषतः तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांनाही या यादीत स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.
बिग बॉस मराठीमध्ये दरवर्षी अभिनेते-अभिनेत्रींसोबतच सोशल मीडिया स्टार्सना संधी दिली जाते. मागील सीझनमध्ये सूरज चव्हाण आणि ‘छोटा पुढारी’ यांना त्यांच्या फॅन फॉलोइंगमुळे स्पर्धक म्हणून निवडण्यात आले होते.
या पद्धतीनेच यंदाही चॅनल सोशल मीडिया लोकप्रियतेचा विचार करून ही प्राथमिक निवड करत असल्याचे समजते. धाराशिव जिल्ह्यातील हे दोन तरुण गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर आपली स्वतंत्र छाप पाडत आहेत. राज्यभर त्यांची लोकप्रियता वाढत असताना बिग बॉसमधून त्यांना संधी मिळाल्यास हा जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे.
सध्या चॅनलकडून केवळ प्राथमिक चर्चाच सुरू असून अंतिम स्पर्धकांची यादी काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. नागेश मडके, लक्ष्मण भोसले आणि रवी काळे हे तिघेही बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार का? याबाबतची अधिकृत माहिती लवकरच मिळणार आहे.








