आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगरपरिषद निवडणूक 2025 साठी 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर शहरात आता निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एकूण 20 प्रभागांमधून 41 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली असून या पैकी 38 नगरसेवकासाठी मतदान 2 डिसेंबरला पूर्ण झाले. तर न्यायालयीन प्रक्रियेमुळे स्थगिती आलेल्या 3 जागांसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान घेतले जाणार आहे.
विशेष म्हणजे झालेल्या आणि होणाऱ्या मतदानाची एकत्रित मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे आणि याच दिवशी धाराशिव नगरपरिषदेच्या सत्तेचा कौल ठरणार आहे. मतमोजणीस अजून 17 दिवस असतानाच शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. प्रभागनिहाय मतदानाची आकडेवारी समोर आल्यानंतर प्रत्येक पक्षाकडून अंदाज-तर्कांच्या मालिका सुरू झाल्या आहेत.
मतदारांच्या गल्लोगल्ली चर्चा, होत आहेत. बूथवरील वातावरण पाहून संभाव्य विजेत्यांची नावं फिरू लागली आहेत.
नगराध्यक्षपदासाठी भाजपा, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (शरद पवार गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष असे एकूण 6 उमेदवार रिंगणात होते. मात्र स्थानिक राजकारणातील स्थितीनुसार खरा मुकाबला भाजपा-शिवसेना (उबाठा) विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असा तिरंगी लढत होईल अशी चर्चा रंगली आहे.
मतदानाचा एकूण आढावा –
धाराशिव नगरपरिषद हद्दीत एकूण 94,006 मतदारांपैकी 57,478 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष – 30,365,
महिला – 27,107, इतर – 6 मतदार
असे मतदान झाले असून एकूण मतदान टक्केवारी 61.14% अशी नोंदली गेली. जिल्ह्यातील इतर सात नगरपरिषदांच्या तुलनेत धाराशिव मध्ये सर्वात कमी मतदान झाले आहे.
प्रभागनिहाय मतदानाचे असे आहे चित्र –
प्रभाग – एकूण मतदार – झालेले मतदान – टक्केवारी
1 – 4566 – 2794 – 61%
2 – 4081 – 2309 – 56.57%
3 – 3364 – 2018 – 59.98%
4 – 4820 – 2932 – 60.82%
5 – 3814 – 2495 – 65.41%
6 – 3524 – 2234 – 63.39%
7 – 5236 – 2798 – 53.43%
8 – 4084 – 2484 – 60.82%
9 – 4101 – 2202 – 53.69%
10 – 3586 – 1956 – 54.54%
11 – 4484 – 2626 – 58.56%
12 – 4267 – 2608 – 61.69%
13 – 5940 – 3624 – 61%
14 – 4574 – 2913 – 63.68%
15 – 5959 – 4279 – 71.80%
16 – 5841 – 3549 – 60.76%
17 – 4754 – 3096 – 65.12%
18 – 6139 – 3955 – 64.42%
19 – 5637 – 3279 – 58.16%
20 – 5283 – 3327 – 62.97%
सर्वाधिक मतदान प्रभाग 15 मध्ये 71.80% झाले आहे तर सर्वात कमी मतदान प्रभाग 7 मध्ये 53.43% झाले आहे. 20 डिसेंबर रोजी स्थगित 3 प्रभागांचे मतदान होणार आहे. तसेच 21 डिसेंबर रोजी संपूर्ण मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे. या निकालावरून धाराशिव नगरपरिषदेत कोणता पक्ष सत्ता स्थापन करणार, कोण नगराध्यक्ष होणार याचा अंतिम निर्णय होणार आहे. आगामी 17 दिवसांत राजकीय नाट्यमय घडामोडी आणि संभाव्य विजेत्यांची चर्चा अधिकच तापू लागणार हे निश्चित आहे.








