राष्ट्रसेवादलाचे माजी अध्यक्ष,समाजवादी नेते,आपलं घर प्रकल्प आधारवड,असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान पन्नालाल भाऊ सुराणा यांचे वयाच्या 93 व्या वर्षी देहावसान झाले. त्यांच्या पश्चात मुलगा प्रभास, आणि कन्या आरती असा परिवार असून त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे पार्थिव
सोलापूर सिव्हिल मेडिकल कॉलेज ला देहदान करण्यात आले, हजारो अनाथांचे तारणहार पन्नालालजी सुराणा हे मूळचे बार्शीचे शाळेत असतानाच ते राष्ट्रसेवा दलात दाखल झाले,पुढे तरुणपणी त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सोखादेवरा येथील सर्वोदय आश्रमात राहून भूदान चळवळीत भाग घेतला, समाज प्रबोधन संस्थेचे सचिव, समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणून ही त्यांनी काम पाहिले, महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पत्रकारिता केली, मराठवाडा दैनिकाचे ते संपादक होते साथी सुराणा यांचा व्यासंग दांडगा होता शिक्षण, शेती,बेरोजगारी, या विषयावर त्यांनी विपुल लिखाण केले आहे, ते गेल्याची बातमी धक्कादायक होती,
जगण्याला हलकी, ऊबदार फुंकर घालून प्रत्येकाला सोन्यासारखे घडवण्याची किमया ज्यांच्या स्वभावात होती, असे अवलिया व्यक्तिमत्त्व म्हणजे पन्नालालजी सुराणा.
त्यांनी राजकीय, आर्थिक, वैज्ञानिक, अशा विविध विषयावर 40 पुस्तके लिहिली आहेत, दुष्काळ निवारण,निर्मूलन, शेतकरी, शेतमजूर यांच्या हक्कासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली, आणीबाणी च्या काळात ते भूमिगत होते, त्या नंतर त्यांना अटक झाली होती, भूमी मुक्ती आंदोलनात त्यांना 4 वेळा त्यांना तुरुंगवास झाला होता, लातूर किल्लारी भागात झालेल्या भूकंपात निराधार झालेल्या मुलासाठी त्यांनी नळदुर्ग येथे आपलं घर ही निवासी शाळा सुरू केली, पर्यावरण आणि जलसंधारण क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.
काही दिवस पत्नी डॉ. वीणाताई यांच्या समवेत त्यांचे बिहारमध्ये वास्तव्य होते, त्या नंतर समाजवादी पक्षात त्यांनी काम केले, जनता पक्षाचे ते प्रदेश सचिव होते, बार्शी येथील विधानसभा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात त्यांनी निवडणूक लढवली होती, सन 2015 साली त्यांनी नळदुर्ग शहरातील बहुतांश कुटुंबीयांची घरे नगर परिषद प्रशासनाने पाडली होती त्या विरुद्ध त्यांनी वयाच्या 83 व्या वर्षी आंदोलन करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून दिला होता.
त्यांच्या आयुष्याचे अनेक पैलू आहेत त्यातील प्रमुख म्हणजे पत्रकारिता, आंदोलन, राजकारण, देशभक्तीचे उपक्रम सगळंच अद्वितीय. त्यांची माणुसकी, समर्पण आणि संवेदनशीलता फार महान होती
नळदुर्ग येथील ‘आपलं घर’भूकंपग्रस्त अनाथ मुलांसाठी उभारलेले निवासगृह व शाळा आजही निराधारांचा मोठा आधार आहे.आपल घर येथील भाजी पाल्याची शेती अफलातून आहे, आपणच पिकवलेला भाजीपाला आपल्याच हॉटेल ला वापरायचा म्हणजे स्वावलंबन हा मोठा मंत्र ते विद्यार्थ्याला देत असत ,८०–९० वर्षांच्या वयातही त्यांची कामाविषयीची तळमळ, समाजाबद्दलची ओल आणि जगण्याचा उत्साह, तरुणांना लाजवेल असाच होता,
अशी माणसं जिवंत राहणं समाजातील वंचित घटकांसाठी, गरजूंसाठी, असंघटित समाजघटकांसाठी अत्यंत आवश्यक असते. पण नियतीपुढे कोणाच काही चालत नाही आज ते आपल्यातून निघून गेले आज हजारो निराधारांचा आधार गेला,
आज त्यांचं जाणं म्हणजे
“अनाथांचा नाथ गेला.
भावपूर्ण श्रद्धांजली.
श्रीकांत अणदूरकर
पत्रकार अणदूर










