आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव शहरातील काही मतदान केंद्रांवर आज शेवटच्या तासाभरात मतदारांची मोठी गर्दी उसळली असून सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतरही मतदान प्रक्रिया सुरूच होती. शहरातील अनेक केंद्रांवर मतदारांच्या लांबलचक रांगा दिसत असल्याने काही ठिकाणी मतदान प्रक्रिया रात्री साडेसात ते आठ वाजेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.
धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिकांसाठी आज सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान पार पडत आहे. मात्र, धाराशिव नगरपालिकेत दिवसभर अत्यल्प मतदान झाल्याचे चित्र दिसून आले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत केवळ 45.53 टक्के मतदानाची नोंद झाली होती. शेवटच्या दोन तासांत वाढलेल्या गर्दीचा वेग पाहता आणखी 12 ते 15 टक्के मतदान होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
खाजा नगर परिसरातील जिल्हा होमगार्ड कार्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर सायंकाळी पाचच्या सुमारास मोठी रांग लागली होती. केंद्राबाहेर जमा झालेल्या प्रचंड गर्दीमुळे काही काळ गोंधळाचे वातावरणही निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी मतदारांना रांगेत उभे राहण्यास भाग पाडत गर्दी हटवली.
यावेळी निरीक्षक शिल्पा करमरकर यांनी स्वतः सायंकाळी पाच वाजता मतदान केंद्राला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. मतदारांना शांततेत मतदान करण्याचे आवाहन करत त्यांनी पोलिस बंदोबस्त अधिक मजबूत करण्याचे निर्देश दिले.
शेवटच्या तासात मतदानाचा वेग वाढल्याने एकूण मतदानाचा टक्का काही प्रमाणात सुधारण्याची शक्यता असली, तरी दिवसभर कमी प्रतिसादामुळे मतदानाची टक्केवारी समाधानकारक नसल्याचे आकडेवारी वरून दिसत आहे.








