आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिवच्या जिजाऊ चौकात झालेल्या प्रचार सभेत महाराष्ट्राचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाची राजकीय भूमिका जाहीर करत शिवसेना (शिंदे गट) भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. नेहा राहुल काकडे यांना स्पष्ट पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. धाराशिवमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपावरून द्वंद्व निर्माण झाले होते. भाजपने पाठीत खंजीर खुपसला अशी गंभीर टीका शिवसेनेने केली होती. शिवसेनेने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार न दिल्यामुळे पक्षाची भूमिका काय राहणार याकडे शहराचे लक्ष लागले होते अखेर धाराशिव मध्ये झालेल्या प्रचार सभेत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली आहे.
शहरातील जिजाऊ चौकात झालेल्या सभेत सरनाईक यांनी विविध प्रश्नांवर भाष्य करत सरकारच्या योजनांची माहिती दिली आणि विरोधकांवर जोरदार टीका केली.
सरनाईक म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी विरोधक सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र ही योजना कोणत्याही परिस्थितीत थांबू देणार नाही, हे शिंदे साहेबांनी ठामपणे सांगितले आहे. धाराशिव शहर व जिल्ह्यात सुरु असलेल्या विकासकामांचा आढावा घेत सरनाईक म्हणाले की,अनेक सिंचन प्रकल्प मार्गी लावण्याचे काम सुरू आहे.शहरात सुरक्षेच्या दृष्टीने नव्या उपक्रमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. कुष्ठधाम येथे जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे काम सुरू झाले आहे. शहरातील शादीखाना, रस्ते, उद्याने, जलतरण तलाव, बोंबले हनुमान रस्ता अशा प्रश्नांवर आचारसंहिता संपताच जलद निर्णय घेतले जाणार आहेत.
यावेळी सरनाईक यांनी 140 कोटींचा बंद पडलेला प्रकल्प 4 डिसेंबरला पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली.नगर पालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागताच छत्रपती शिवाजी महाराज चौकात नारळ फोडून या प्रकल्पाला गती देऊ. दीड वर्षांत शहरातील सर्व रस्त्यांची स्थिती बदलून जाईल, असे ते म्हणाले.
सभेत महायुतीतील जागावाटपाच्या संदर्भाने मोठा खुलासा करत सरनाईक म्हणाले की, महायुतीत एकत्रित निवडणूक लढवण्याची आमची भूमिका होती. मात्र आमच्या वाट्याला दिलेल्या जागांवरही अर्ज दाखल करण्यात आले. ही आमची फसगत झाली. तरीही मोठेपणाने आम्ही भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तरी मान–सन्मान राखला जावा, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ज्या प्रभागांमध्ये शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत, तिथे शिवसेनेलाच मतदान करा. आणि नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या नेहा काकडे यांना मतदान करून विकासाला पाठिंबा द्या,असे आवाहन त्यांनी केले.
यापूर्वी जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे व जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी शहरातील विविध समस्यांवर भूमिका मांडत सत्ताधारी महायुतीने केलेल्या कामांचा परामर्श घेतला.या घोषणेमुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलू शकतात, हे निश्चित. या सभेला शिवसेनेचे पदाधिकारी, उमेदवार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












