आरंभ मराठी / ढोकी
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर, धाराशिव रोड रेल्वे गेटच्या अलीकडे रस्त्यालगत एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी स्थानिक नागरिकांना हे प्रेत दिसताच त्यांनी तातडीने ढोकी पोलिसांना माहिती दिली.
साधारण तीस वर्षे वयाची विवाहित महिला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. महिलेच्या शरीराचा मधला भाग पूर्णतः जळून खाक झाला असून चेहऱ्याचा आणि पायांचा भाग अर्धवट जळालेला आहे. पायात जोडवे आणि पैंजण असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
घटनास्थळाची स्थिती पाहता ही घटना बुधवार २६ नोव्हेंबरच्या रात्री अकराच्या सुमारास ते गुरुवार २७ नोव्हेंबरच्या पहाटे दरम्यान घडली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. सदर महिलेची हत्या इतरत्र करून प्रेत येथे आणून जाळल्याचा गंभीर संशय व्यक्त केला आहे. रेल्वे गेट परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने फुटेजच्या आधारे गुन्ह्याचा तपास लवकर गती घेण्याची शक्यता आहे.
हा परिसर कायम गजबजलेला असून सध्या ऊस वाहतुकीचा हंगाम असल्याने रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरू असते. मात्र पहाटेच्या सुमारास वर्दळ कमी असते, त्यामुळे त्याच वेळेत मृतदेह बाहेरून आणून टाकण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
माहिती मिळताच ढोकी पोलिस तपास पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्यात येत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक नियुक्त केले आहे. घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून ढोकी पोलीस पुढील तपास करत आहेत.












