आरंभ मराठी / धाराशिव
बेकरी मशिनरी पुरविण्याच्या आमिषाने एका महिला व्यावसायिकेकडून तब्बल १२ लाख ५० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सोलापूर येथील एका व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी भाग्यश्री विठ्ठल लांडगे (वय २६ वर्षे, रा. पाडोळी, ता. जि. धाराशिव) यांनी आपल्या व्यवसायासाठी बेकरी मशिनरी घेण्याचे ठरवले होते. त्यावेळी आरोपी बिजली मेहतो (रा. सोलापूर) यांनी त्यांचा विश्वास संपादन करून “आहन व इतर बेकरी मशिनरी मी आणून देतो” असे सांगितले.
यानंतर दिनांक २३ मे २०२५ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत, धाराशिव येथील युनियन बँकेत फिर्यादींकडून आरोपीने आरटीजीएस तसेच फोनपे द्वारे एकूण १२,५०,००० रुपये घेतले. मात्र, त्यानंतर कोणत्याही प्रकारची मशिनरी न देता आरोपीने फिर्यादींची फसवणूक केली.
या प्रकरणी फिर्यादी भाग्यश्री लांडगे यांनी दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी आनंदनगर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३१६ (२), ३१८ (४) अन्वये फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. घटनेचा पुढील तपास आनंदनगर पोलिस करीत आहेत.









