आरंभ मराठी / धाराशिव
खरीप हंगामात धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतपीक, शेतजमीन, रस्ते, सार्वजनिक तसेच वैयक्तिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे चार सदस्यीय पथक आज (दि.५ नोव्हेंबर) जिल्ह्याच्या दौर्यावर आले आहे. वास्तविक पाहता ओल्या दुष्काळाचे संकट सरून गेले असून, पूर ओसरला आहे.तसेच दुष्काळाच्या पाऊलखुणा अस्पष्ट झाल्यानंतर पथक दौऱ्यावर आले असून, पथकाला या दौऱ्यातून काय निष्पन्न करायचे आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव आर. के. पांडे यांच्या नेतृत्वाखालील हे पथक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहे. या पथकात कृषी व ग्रामीण विकास विभागातील अधिकारी देखील सहभागी असून, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार आणि अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील हे अधिकारी पथकासोबत उपस्थित राहणार आहेत.
दौर्याची सुरुवात परंडा तालुक्यातील खासगाव येथे होणार असून, त्यानंतर हे पथक भूम तालुक्यातील काही गावांना भेट देऊन प्रत्यक्ष शेतजमिनींची स्थिती पाहणार आहे. तसेच स्थानिक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये धाराशिव जिल्ह्यात तीन ते चार वेळा मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
जिल्ह्यातील सर्व 42 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. काही महसूल मंडळात तब्बल पाच वेळा अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आल्याने शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. जिल्ह्यातील 8500 हेक्टर जमिनीवरील माती वाहून गेली तर 400 पेक्षा अधिक पशुधनाचा अतिवृष्टीमध्ये मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमध्ये नऊ नागरिकांचा देखील विविध कारणाने मृत्यू झाला आहे. यामध्ये जिल्ह्यातील 5 लाख शेतकरी बाधित झाले आहेत.
आतापर्यंत धाराशिव जिल्ह्याला 1100 कोटींची शासकीय मदत जाहीर करण्यात आली असून, अनुदान वितरणाचे काम मंद गतीने सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी आहे. अतिवृष्टीमुळे रस्ते, पूल आणि सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले.
केंद्र सरकारकडून पाठवण्यात आलेल्या या पथकाच्या पाहणीनंतर शेतकऱ्यांना मदत आणि पुनर्वसनासाठी आवश्यक प्रस्ताव सादर केला जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असून, संबंधित विभागांना दौऱ्याच्या अनुषंगाने माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील शेतकरी या पाहणी दौर्याकडून मदत मिळण्याच्या अपेक्षेने उत्सुक आहेत. अतिवृष्टीनंतर तब्बल दीड महिन्यांनी हे केंद्रीय पथक जिल्ह्यात पाहणीसाठी येत असल्याने शेतकऱ्यांना वाढीव मदतीची अपेक्षा आहे.









