‘अशी आहे आरक्षणाची सोडत’
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नगर परिषद धाराशिवच्या २० प्रभागांतील आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय तसेच सर्वसाधारण महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर जागा राखीव ठरल्या आहेत.
सकाळी नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत आरक्षणाची प्रक्रिया पार पडली. परिशिष्ट ७ नुसार जाहीर करण्यात आलेल्या या यादीनुसार, २० पैकी जवळपास अर्ध्याहून अधिक प्रभाग महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
घोषित आरक्षणानुसार
अनुसूचित जाती (अ.जा.) व अनुसूचित जमाती (अ.ज.) या प्रवर्गांतील पुरुष व महिला उमेदवारांना प्रभाग क्रमांक १, ३, ७, ८, १३, १४ आणि २० मध्ये संधी मिळाली आहे.
मागासवर्गीय प्रवर्ग (ना.मा.प्र.) साठी प्रभाग क्रमांक २, ४, ६, ९, ११, १६ आणि १९ राखीव ठेवण्यात आले आहेत.
तर सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी प्रभाग क्रमांक ५, १०, १२, १५, १७ आणि १८ आरक्षित आहेत.
यातील प्रभाग क्रमांक १, २, ३, ५, ७, ८, १०, ११, १५, १६, १७, १८ आणि २० हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यामुळे यंदाच्या निवडणुकीत नगर परिषदेत महिलांचा सहभाग लक्षणीय वाढणार आहे.
या आरक्षण सोडतीनंतर नगर परिषद निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. विविध पक्ष व अपक्ष इच्छुक आता आपल्या प्रभागातील आरक्षणानुसार रणनीती आखत आहेत. धाराशिव शहराच्या राजकारणात या नव्या आरक्षणामुळे अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
निवडणूक विभागाने सांगितले की, ही सोडत राज्य शासनाच्या नियमावलीनुसार पारदर्शक पद्धतीने पार पडली असून, संपूर्ण प्रक्रिया अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आली. आता अंतिम प्रभागनिहाय आरक्षण यादीच्या अधिसूचनेनंतर निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत घोषणा अपेक्षित आहे.