चंद्रसेन देशमुख / आरंभ मराठी
तुळजापूर : राज्यात झालेल्या अतिवृष्टीने प्रचंड अडचणी असूनही तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात यंदा भाविकांची उपस्थिती लक्षणीयरीत्या वाढली आहे.
यंदा भाविकांच्या संख्येत वाढ झाली असून, हे मागील काही वर्षांतील सर्वाधिक वाढीचे प्रमाण मानले जात आहे.या काळात भीषण परिस्थिती असल्याने भाविकांनी संकटातून मुक्ती देण्यासाठी मातेला साकडे घातले.
राज्यात यंदा अभूतपूर्व पाऊस झाला. 100 वर्षांचे रेकॉर्ड मोडले. साहजिकच यामुळे शेती,घरांचे प्रचंड नुकसान झाले. शारदीय नवरात्र उत्सव आणि राज्यात मुसळधार पावसाचा जोर एकाच वेळी सुरू होता. परिणामी भाविकांची संख्या कमी झाली.मात्र,काही दिवस ही गर्दी कमी दिसली तरी नंतर भक्तीचा जागर वाढतच गेला. संकटातून मुक्ती मिळावी,यासाठी भाविकांनी मातेला साकडे घातले.कोजागरी पौर्णिमा वगळता शारदीय नवरात्र उत्सवात म्हणजे
22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या 11 दिवसांच्या कालावधीत भाविकांच्या संख्येचा अभ्यास केल्यास या कालावधीत एकूण 8 लाख 35 हजार 401 भाविकांनी मातेचे दर्शन घेतले.
तर 2024 मध्ये 3 ते 13 ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या नवरात्रात एकूण 6 लाख 71 हजार 610 भाविकांनी दर्शन घेतले होते. यंदाच्या नवरात्रात काही दिवस भाविकांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत अधिक होती, विशेषतः 22, 26,28,30 सप्टेंबर 2025 आणि 1 ऑक्टोबर रोजी गर्दीने उच्चांक गाठला.
उदाहरणार्थ दहाव्या दिवशी 1 ऑक्टोबर रोजी 59 हजार 780 भाविकांनी दर्शन घेतले, तर मागील वर्षी उत्सवातील दहाव्या दिवशी 36 हजार 568 भाविकांनी मातेच्या चरणी माथा टेकवला. म्हणजेच या दिवशी भाविकांच्या संख्येत 38.83 टक्के वाढ झाली.
तसेच 28 सप्टेंबरला 1,03904 भाविकांनी दर्शन घेतले. मागील वर्षाच्या तुलनेत सातव्या माळेला हे प्रमाण 32.20 टक्क्यांनी अधिक होते.
संपूर्ण नवरात्र कालावधीत भाविकांच्या उपस्थितीत सर्वाधिक वाढ 19.61 टक्क्यांनी नोंदली गेली असून, मंदिर संस्थानकडून पुरविण्यात आलेल्या सुविधा, वाहतूक नियोजन, ऑनलाइन दर्शन व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या चोख बंदोबस्तामुळे भाविकांना सोयीचे वातावरण मिळाले.
मंदिराचे पूरग्रस्तांसाठी 1 कोटींचे योगदान
तुळजाभवानी मंदिर संस्थानने यावर्षी शारदीय नवरात्रात उत्सवात 50 लाखांवर भाविक येतील, असा अंदाज गृहीत धरून नियोजन केले होते. मात्र, ऐन नवरात्र उत्सवात राज्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे भाविकांची संख्या रोडावली. मात्र या अडचणीच्या काळात तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी एक कोटींची मदत जाहीर करण्यात आली, त्यामुळे मंदिर प्रशासनाच्या या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले.
जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती कुमार पुजार यांनी या संकटाच्या काळात पूर परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी चोख यंत्रणा राबवून,मंत्र्यांचे दौरे,शासनाला दैनंदिन माहिती पुरवणे, शारदीय नवरात्र उत्सव आणि संस्कृतिक महोत्सवाचे काटेकोर नियोजन केले.हा काळ जिल्हा प्रशासनाची कसोटी पाहणारा होता.