आरंभ मराठी / धाराशिव
जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली असून, आजच यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाला आहे.त्यानुसार जिल्ह्यातील एकूण २ लाख ३४ हजार ९५५ शेतकऱ्यांना तब्बल १८९ कोटी ६० लाख ६७ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात सध्या प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेली मदत ही अपुरी असून, अजून दुसऱ्यांदा मदत जाहीर केली जाणार आहे.
जून ते ऑगस्ट महिन्यातील नुकसानीच्या अनुषंगाने धाराशिव तालुक्यातील ४३,०६५ शेतकरी व ४६,६३० हेक्टर क्षेत्रावरील नुकसानग्रस्त पिकांसाठी ३९ कोटी ५५ लाख १२ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तुळजापूर तालुक्यातील २४,२१० शेतकऱ्यांना २२ कोटी ६१ लाख ७८ हजारांची मदत मिळणार आहे. उमरगा तालुक्यात ५०२ शेतकऱ्यांना २३ लाख ३२ हजार, तर लोहारा तालुक्यातील २३,२५९ शेतकऱ्यांना २१ कोटी ८६ लाख ३ हजार रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे.
भुम तालुक्यातील ४२,३७६ शेतकरी बाधित असून त्यांना २८ कोटी ३१ लाख १५ हजारांची मदत मिळणार आहे. परंडा तालुक्यातील १२,२१४ शेतकऱ्यांना ५२ लाख १६ हजार, कळंब तालुक्यातील ६६,५४४ शेतकऱ्यांना ५० कोटी ८८ लाख ५८ हजार आणि वाशी तालुक्यातील २३,८३५ शेतकऱ्यांना २५ कोटी ६४ लाख १२ हजारांची मदत शासनाने मंजूर केली आहे.
या भरपाईमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरी, नुकसान मोठ्या प्रमाणात असल्याने आणखी मदतीची मागणी शेतकरी केली जात आहे. सध्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, भुईमूग यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.भाजीपाल्याची प्रचंड नासाडी झाली आहे.
जाहीर झालेली ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असून, यासाठी प्रशासनाने कार्यवाहीला सुरुवात केली आहे.दरम्यान, मदतीसाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज असून, शासनाने आता सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी केली आहे.