सूरज बागल / आरंभ मराठी
तुळजापूर; महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात घटस्थापनेने सुरुवात झाली आहे. तुळजाभवानी मंदिरात आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो, असा जयघोष करत मंदिर संस्थांनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. यावेळी विश्वस्त तथा आमदार राणाजगजीतसिंह पाटील, अर्चनाताई पाटील, व्यवस्थापक तथा तहसीलदार माया माने, पुजारी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तत्पूर्वी पहाटे श्री तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली व अभिषेकानंतर आरती करण्यात आली. त्यानंतर मानकरी, विश्वस्त ,पुजारी, भाविकांच्या उपस्थितीत घटकलशाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर देवींच्या सिंहगाभाऱ्यात घटस्थापना करण्यात आली. मंदिरातील घटस्थापना झाल्यानंतर तुळजापुरातील घरोघरी घटस्थापना करण्यात आली.
यामुळे मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण तयार झाले आहे. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून मंदिरास आकर्षक फुलांची सजावट देखील यावेळी करण्यात आली आहे.
_____
25 हजार क्षमतेचा वॉटरप्रूफ मंडप
शारदीय नवरात्र महोत्सवात भाविकांना घाटशीळ कार पार्किंगमार्गे प्रवेश देण्यात येणार असून, यासाठी येथे 25 हजार भाविकांच्या क्षमतेचा वॉटरप्रूफ दर्शन मंडप उभारण्यात आला आहे. या दर्शन मंडपातून धर्मदर्शन, मुखदर्शन ,अभिषेक दर्शन, व पेड दर्शन अशा चार रांगा असणार आहेत.
_________
नवरात्र महोत्सव सांस्कृतिक महोत्सव,
यावर्षी मंदिर संस्थानकडून नवरात्र महोत्सवात दररोज सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला असून, तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या आवरत दररोज संध्याकाळी सहा ते नऊ या वेळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत, जुईली जोगळेकर ,पद्मनाम गायकवाड यांचा संगीत संध्या हा कार्यक्रम होणार असून, यासाठी भाविकांनी व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिर संस्थांकडून करण्यात आले आहे.