तातडीने मदत द्या,अन्यथा रस्त्यावर उतरू; आमदार कैलास पाटील यांचा इशारा
धाराशिव : आरंभ मराठी
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश पावसाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी कळंब तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख आणि डोळ्यांतील अश्रू पाहून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मायबाप सरकारने तात्काळ ठोस मदत न दिल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल,असा थेट इशारा आमदार पाटील यांनी दिला.
आमदार पाटील यांनी शेलगाव (ज), सातेफळ, वाघोली यांसह अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. पाहणीवेळी प्रत्येक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख, डोळ्यातील अश्रू आणि भविष्यातील अनिश्चितता स्पष्टपणे दिसत होती. ढगफुटीमुळे शेतपिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. जनावरांसाठी चारा नाही, घरे उद्ध्वस्त झाली आहेत, शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे,असे त्यांनी सांगितले.
सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करताना आमदार पाटील म्हणाले, अशा गंभीर परिस्थितीतही सरकारकडून कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही, हे अत्यंत संतापजनक आहे. आणखी किती हानी झाल्यावर यंत्रणेचे डोळे उघडणार, हा मोठा प्रश्न आहे.
दौऱ्यानंतर त्यांनी शासनाला तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करण्याची आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल,असा इशारा त्यांनी दिला.
मदतीत दुजाभाव का?
ऑगस्टमध्ये इतर जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली, मात्र धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप ती मदत मिळालेली नाही. सरकार शेतकऱ्यांशी दुजाभाव करत आहे. यामुळे त्यांचं शेतकऱ्यांप्रती असलेलं ढोंगी प्रेम लक्षात येत आहे,असा आरोपही आमदार पाटील यांनी केला.