गुरुवर्य के. टी. पाटील जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद
आरंभ मराठी / धाराशिव
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या वतीने गुरुवर्य के. टी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांची सुरुवात सोमवारी वादविवाद स्पर्धेने झाली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सध्याच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक प्रश्नांवर आपले विचार मांडून वादविवादाला धार दिली.
यानंतर मंगळवारी झालेल्या शालेय वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील विविध शाळांमधील तब्बल 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे शाळेचे प्रांगण ज्ञान, विचार आणि उत्साहाने गजबजून गेले होते.
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड व संवर्धन, व्यसनाधीनता, मोबाईलचा विळखा, लोककला, संत परंपरा, वन्यजीवांचे जीवन, जल जीवन, शिक्षण, कौटुंबिक संस्कार अशा विविध विषयांवर प्रभावी भाषण केले. प्रत्येक विषयावर विद्यार्थ्यांनी केवळ भाषणच केले नाही तर आपल्या सशक्त विचारांनी समाजासमोरील प्रश्नांवर उपाय सुचवले.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांची आत्मविश्वासपूर्ण व प्रभावी मांडणी. काही विद्यार्थ्यांनी विनोदी शैलीत आपले विचार मांडले तर काहींनी हृदयस्पर्शी उदाहरणे देत प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडले. या सगळ्या वातावरणात खरी वक्तृत्वाची मेजवानीच रंगली.
कार्यक्रमाला संस्थेच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, पालक प्रतिनिधी संजय गुरव, प्राचार्य एन. आर. नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे, प्रा. प्रमोद कदम, अरुण बोबडे, पी. एन. गाडे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वक्तृत्व ही नेतृत्वाची पहिली पायरी असून, अशा स्पर्धांमुळे विद्यार्थी जीवनमूल्यांचा ठसा उमटवतात,असे प्रतिपादन केले.
गुरुवर्य के. टी. पाटील यांच्या मार्गदर्शनातून व संस्कारातून उभारलेली ही संस्था आज शिक्षणाबरोबरच संस्कार आणि मूल्याधिष्ठित शिक्षण देण्याचा ध्यास घेत आहे. क्रीडा, विज्ञान, सांस्कृतिक क्षेत्र, वक्तृत्व अशा सर्वच क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यात संस्थेचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच संस्थेचा लौकिक वर्षागणिक अधिकाधिक वृद्धिंगत होत आहे. स्पर्धेचे बहारदार सूत्रसंचालन संदीप जगताप, के. पी.पाटील यांनी केले.