ऑगस्टमध्ये धरण भरण्याची पहिलीच वेळ, शेतकऱ्यांत समाधान; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा
अमोलसिंह चंदेल / आरंभ मराठी
शिराढोण: मराठवाड्यातील धाराशिव व बीड,लातूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला आणि धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठा असलेला मांजरा नदीवरील मांजरा प्रकल्प अवघ्या काही तासांत भरण्याची शक्यता आहे. कारण पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसाने धरणात अवघ्या ४ दिवसात ४७ टक्क्यांनी पाणी साठा वाढला असून, धरण ८२ टक्क्यांवर पोहोचले आहे. पाणलोट क्षेत्रात पाण्याची जोरदार आवक असल्याने येथे धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे ऑगस्ट महिन्यात धरण भरण्याची इतिहासातील पहिलीच वेळ असेल. त्यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त केले जात आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी,असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील धाराशिवसह कळंब, वाशी, भूम, परंडा या भागात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने परिसरातील अनेक प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत. लातूर, बीड, धाराशिव जिल्ह्यासाठी वरदान असलेला मांजरा प्रकल्प देखील भरण्याच्या मार्गावर आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. त्यामुळे अवघ्या तीन ते चार दिवसात धरणातील पाणीसाठा ४७ टक्क्यांनी वाढला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात धरण भरण्याची होण्याची शक्यता आहे.
धरण प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार १६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत धरणातील साठ्याची स्थिती
एकूण क्षमतेपैकी साठा : १९३.६१३ दलघमी / २२४.०९३ दलघमी
जिवंत साठा : १४६.४८३ दलघमी / १७६.९६३ दलघमी (८२.७८ %)
मृत साठा : ४७.१३० दलघमी (पूर्ण)
पाणीपातळी : ६४१.६५ मीटर / ६४२.३७ मीटर
चालू आवक : ५.५६७ दलघमी
हंगामी आवक : १०७.६८६ दलघमी
आवक दर : ५१५.४६ क्यूमेक्स (१८,२००.९९ क्यूसेक्स)
शेतीसाठी वरदान:
धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास कळंब तालुक्यातील खडकी, लोहटा (पूर्व-पश्चिम), करंजकल्ला, कोथळा, हिंगणगाव, दाभा, आवाड शिरपूरा, सौंदणा आंबा, वाकडी यांसह परिसरातील अनेक गावांतील एकूण १८,२२३ हेक्टर शेती क्षेत्राला पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे ऊस शेतीसह प्रयोगशील शेतीला चालना मिळणार असून, या भागाची “ग्रीनबेल्ट” म्हणून ओळख पुन्हा एकदा ठळक होईल. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन परिसरात संपन्नता निर्माण होणार आहे.
नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा:
धरणाकडे येणारा पाण्याचा वेग पाहता पुढील दोन दिवसांत धरण पूर्ण भरून वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्यास धरणातून विसर्ग सुरू होण्याचीही शक्यता आहे. नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.