आरंभ मराठी / धाराशिव
पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या तीन पोलीस कॉन्स्टेबलवर एका तरुणाने पोलीस ठाण्यातच तलवारीने वार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.५) दुपारी दोन वाजता घडली.
यावेळी आरोपीने पोलीस ठाण्यातच तलवार घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार भूम पोलीस ठाण्यात घडला. यावेळी तीन कॉन्स्टेबलवर आणि एका व्यक्तीवर आरोपीने तलवारीने वार केले. तसेच पोलीस ठाण्यातील काचेच्या वस्तूंची तोडफोड केली.
या घटनेने भूम शहरासह परिसरात खळबळ उडाली. यासंबंधी सविस्तर वृत्त असे की,
आरोपी शुभम संजय भोसले (वय 23 वर्षे, रा. कसबा भुम ता. भुम) याने दिनांक 5 ऑगस्ट रोजी दुपारी पावणे दोन वाजता तलवार घेऊन भूम पोलीस ठाण्यात प्रवेश केला.
तिथे फिर्यादी कॉन्स्टेबल गणेश दत्तु पाटील (वय 37 वर्षे) हे ठाणे अंमलदार म्हणून ड्युटीवर असताना आरोपीने दहशत निर्माण करुन तलवारीचा वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने तो वार हुकवल्यामुळे फिर्यादीचा जीव वाचला.
यावेळी गणेश पाटील यांच्यासोबत असलेल्या दत्ता शिंदे याच्यावर आरोपी शुभम भोसले याने तलवारीने वार केले. यामध्ये दत्ता शिंदे हे गंभीर जखमी झाले.यावेळी आरोपीने पोलीस ठाण्यातील ठेबलवरील काच फोडून 10,000 रुपयांचे नुकसान केले.
पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेले हवालदार कवडे व शिंदे यांनाही तलवारीने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीने दहशत निर्माण करुन शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करून जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाचे उल्लघंन केले.
याप्रकरणी फिर्यादी गणेश पाटील यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भूम पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.कलम 109, 132, 118(2), 324(4),125, 352, 351 (3) सह कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा,मपोका कलम 135, सह फौजदारी दुरुस्ती कायदा कलम 7 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.